दागिन्यांशी अतूट नाते, काय मस्त आहे!
By Admin | Published: April 20, 2017 03:22 AM2017-04-20T03:22:21+5:302017-04-20T03:22:21+5:30
स्त्रिया आणि दागिने यांचे नाते अतूट आहे. आपल्याकडे चालणारा कपड्यांचा आणि दागिन्यांचा ट्रेंड हा सहसा "बॉलीवूड इंस्पायर्ड" असतो
- श्रुती साठे, sa.shruti@gmail.com
स्त्रिया आणि दागिने यांचे नाते अतूट आहे. आपल्याकडे चालणारा कपड्यांचा आणि दागिन्यांचा ट्रेंड हा सहसा "बॉलीवूड इंस्पायर्ड" असतो. नवीन सिनेमात नायिकेने काय घातलेय, ते मला शोभून दिसेल की नाही, याचा बहुतांश स्त्रिया विचार करतात आणि मग त्यातूनच नवीन खरेदी करायची हुक्की येते. मागच्या दशकातल्या सिनेमांत नायिका लालभडक साडी आणि बटबटीत, चमचमणारी ज्वेलरी घालून दिसायच्या. त्यावरूनच कळायचे की, पुढचा सीन हा नक्कीच करवाचौथचा असणार, परंतु आता ट्रेंड बदलतोय, ‘मिनिमलिसम’चा जमाना आलाय. आता नायिका लांब, पण नाजुकसे गळ्यातले घालताना किंवा कानात पर्ल टॉप घालताना दिसतात. हाच लुक आताच्या तरुण मुलींच्या ‘कॅज्युअल’ आणि ‘आॅफिस वेअर’साठी पसंतीस उतरला आहे. असे असूनही पारंपरिक भारतीय पोशाखांवर ठसठशीत दागिन्यांना पसंती दिलेली पाहायला मिळते. सोन्याच्या दागिन्यांना मागे टाकत, त्याची जागा फॅशन आणि ‘इमिटेशन’ ज्वेलरीने घेतलीय.
मल्टि लेअर नेकलेस:
मल्टि लेअर नेकलेस नक्कीच ठसठशीत आणि खानदानी लूक देतो. कुंदन, मोती, माणिक-पाचू इत्यादी खड्यांपासून हा नेकलेस बनवला जातो. २-३ वेगवेगळ्या प्रकारचे आणि लांबीचे हार घालण्यापेक्षा मल्टि लेअर हार खूप खुलून दिसतो. लेहेंगा चोली आणि साड्यांवर हा हार शोभतो.
झुमके : वर्षानुवर्षे स्त्रियांच्या पसंतीस उतरलेला असा हा कानातल्यांचा प्रकार! झुमके आणि मल्टि लेअर नेकलेस यांचा एकत्र वापर खूप खुलून दिसतो. मोती आणि कुंदन वर्क यापासून तयार केलेले झुमके एक वेगळाच लूक देतात. फार सजून जायचे नसल्यास साडीवर नुसते झुमकेसुद्धा सुरेख दिसतात. नुकतेच एका नामांकित कार्यक्रमात आलिया भटने साडीवर झुमके घालून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
चांद बाली : चांद बाली ही चंद्राची कोर असते, तशा आकारामध्ये असतात. हा अतिशय पारंपरिक प्रकार असून, उत्तरेकडे याला विशेष पसंती दिली जाते. हल्लीच्या तरुण मुलींच्या पसंतीस पडतील, असे थोडे-फार बदल याच्या साइजमध्ये करण्यात आले आहेत. करीना कपूर, विद्या बालन इत्यादी नायिकांनी चांद बालीचा सुरेख वापर केलेला आपल्याला दिसून आलाय. सिल्कच्या साडीवर चांद बाली खूप खुलून दिसतात. चांद बाली घातली की, गळ्यातले, बिंदी यांची गरजच भासत नाही.
अंगठी : मोठ्या आणि ठसठशीत अंगठीने सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. विविध प्रकारच्या चेन्सने जोडलेल्या या अंगठ्या हातावर खूप शोभून दिसतात. लग्नात किंवा एखाद्या पारंपरिक कार्यक्रमात मोठी अंगठी खूप सुरेख दिसते.