एलएलबी ३ वर्षांची परीक्षा लांबणीवर; लवकरच नवीन वेळापत्रक जाहीर करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 02:31 AM2019-12-05T02:31:42+5:302019-12-05T02:31:57+5:30
एलएलबी ३ वर्षे या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया या वर्षी बरीच लांबली आहे.
मुंबई : विधि तीन वर्षे अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया नुकतीच पूर्ण झाल्याचे सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आले आहे़ १२ डिसेंबरपासून मुंबई विद्यापीठाकडून संलग्नित महाविद्यालयातील परीक्षा सुरू होणार होत्या. विद्यार्थी आणि पालक तसेच संघटनांकडून वारंवार परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात या मागणीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाकडून त्या लांबणीवर टाकल्या गेल्या आहेत. याचे विद्यापीठाने परिपत्रक जारी केले आहे़ लवकरच नवीन वेळापत्रक जारी करण्यात येणार आहे़ विद्यापीठाच्या या निर्णयामुळे विधि अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
एलएलबी ३ वर्षे या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया या वर्षी बरीच लांबली आहे़ सीईटी सेलकडून विद्यार्थ्यांसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमाच्या यंदा अनेक जागा रिक्त राहिल्याने सीईटी सेलकडून ही मुदतवाढ देण्यात आली. विद्यापीठाकडून प्रवेश परीक्षा पूर्ण होण्याआधीच या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. ही परीक्षा १२ ते २० डिसेंबरदरम्यान आयोजित करण्यात आली होती. प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांसोबत नुकताच प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचाही गोंधळ उडाला होता.
एलएलबीचे अनेक विद्यार्थी एकाच वेळी सीएस आणि विधिच्या परीक्षा देत असतात. त्यांच्यासाठी या दोन्ही परीक्षा महत्त्वाच्या आहेत. विद्यापीठाच्या वेळापत्रकाप्रमाणे २० डिसेंबर रोजी विधिच्या विद्यार्थ्यांचा सकाळी १०.३० ते १.३० या वेळेत कंपनी लॉ विषयाचा पेपर आहे. तर त्याच दिवशी सीएस परीक्षांच्या वेळापत्रकाप्रमाणे सीएसच्या विद्यार्थ्यांची २ ते ५ या वेळेत परीक्षा असणार होती.
या दोन्ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या असल्याने विद्यार्थ्यांचा आणखी गोंधळ उडाला. विद्यापीठाने विद्यार्थी हिताचा विचार करीत आपल्या वेळापत्रकात बदल करावा आणि एकाच दिवशी आलेल्या या परीक्षांतून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्टुडण्ट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी मुंबई विद्यापीठाकडे केली होती. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाकडून विधि अभ्यासक्रमाची परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे़ संबंधित महाविद्यालयांनी याची नोंद घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.