Join us

टीवायचे निकाल जाहीर न झाल्याने एलएलबीचा प्रवेश धोक्यात

By admin | Published: June 26, 2017 1:48 AM

मुंबई विद्यापीठात आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे ‘टीवाय’चे निकाल यंदा उशिरा लागण्याची चिन्हे आहेत. जुलै महिन्याच्या पहिल्या

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विद्यापीठात आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे ‘टीवाय’चे निकाल यंदा उशिरा लागण्याची चिन्हे आहेत. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ‘टीवाय’चे निकाल जाहीर न झाल्यास, एलएलबी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार नसल्याने हजारो विद्यार्थी चिंतेत आहेत. कारण राज्यातील विधि अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया नुकतीच सीईटी सेलतर्फे जाहीर करण्यात आली आहे. या वेळापत्रकानुसार, विद्यार्थ्यांना ५ जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे, पण टीवायचे गुण नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे अर्ज सबमिट होत नसल्याने विद्यार्थ्यांचे चिंता वाढली आहे. राज्य सीईटी सेलतर्फे राज्यातील विधि प्रवेशासाठी घेतलेल्या सीईटी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर, आता तृतीय वर्ष अभ्यासक्रमांसाठी सीईटी सेलने शनिवारी आॅनलाइन सेंट्रलाइज अ‍ॅडमिशन प्रोसेस (कॅप) राउंड नुकतीच जाहीर केली. विधि अभ्यासक्रमाची प्रक्रिया २३ जून ते २७ जुलैपर्यंत सुरू राहाणार आहे, पण अर्ज भरण्यासाठी २३ जून ते ५ जुलैपर्यंतचीच मुदत देण्यात आली आहे. ५ जुलैआधी मुंबई विद्यापीठातील टीवायचे सर्व निकाल जाहीर न झाल्यास, विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा धोका आहे. सीईटी सेलतर्फे जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, २३ जून ते ५ जुलै या काळात विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्ज भाग १ भरावयाचा आहे. त्यानंतर, ७ ते ११ जुलैच्या काळात विद्यार्थ्यांना या अर्जातील त्रुटी दुरुस्ती करण्यासाठी वेळ देण्यात येणार आहे. १७ ते २७ जुलै या काळात महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरावयाचा आहे.