मुंबई - मराठी नाट्यसृष्टीतील प्रयोगशील दिग्दर्शकांचा वारसा समर्थपणे चालवणारे तरुण-तडफदार दिग्दर्शक म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी. ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांची ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’ आणि ‘युगान्त’ ही तीन नाटकं एकत्र करून, नाट्यत्रयीचा अनोखा प्रयोग चंद्रकांत कुलकर्णी यांनी तयार केला. अशा प्रकारची 'ट्रायॉलॉजी' ही महाराष्ट्रातच नाही, तर देशात पहिल्यांदा झाली आहे. त्यांच्या या प्रयोगशीलतेचा गौरव म्हणून त्यांची 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८'साठी निवड करण्यात आली. मृणाल कुलकर्णी आणि राजू शेट्टी यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराचे हे पाचवे पर्व आहे. राजकारण, समाजसेवा, कला, क्रीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिलेदारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. मान्यवर परीक्षकांनी केलेले मूल्यमापन आणि वाचकांचा कौल या आधारे हा विजेता निश्चित करण्यात येतो. वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये सुरू असलेल्या दिमाखदार सोहळ्यात चंद्रकांत कुलकर्णी यांना सन्मानित करण्यात आले.
ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांची ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’ आणि ‘युगान्त’ या तीन नाटकांना एकत्र करून, नाट्यत्रयीचा अनोखा प्रयोग चंद्रकांत कुलकर्णी यांनी तयार केला आहे. मध्यंतरासह आठ तासांचे हे नाटक, २५ कलावंत आणि चार मध्यांतरासह सादर होते, शिवाय याच नाटकांचे वेगवेगळे तीन प्रयोगही केले जात आहेत. अशा प्रकारची ट्रायॉलॉजी ही महाराष्ट्रातच नाही, तर देशात पहिल्यांदा झाली आहे. संहितेच्या पानांत दडलेल्या याच नाट्यत्रयीला रंगभूमीवर सादर करण्याचे महत्त्वाचे कार्य करणारे दिग्दर्शक म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी! या तिन्ही नाटकांचे प्रयोग महाराष्ट्रात करीत ही नाट्यत्रयी त्यांनी नाट्यरसिकांपर्यंत पोहोचविली. या नाट्यत्रयीचे सलग तीन प्रयोग करण्याचे शिवधनुष्य त्यांनी उचलले आणि नाट्यरसिकांच्या पाठबळावर ते पेलूनही दाखविले. सलग ९ तास नाट्यगृहात रसिक बसतील का, हा प्रश्न मायबाप रसिकांनीच सोडविला आणि या नाट्यत्रयीचे सलग प्रयोगही हाउसफुल्ल झाले. दिग्दर्शकाचे कसब, कलावंतांची चोख निवड, यामुळे ही नाट्यत्रयी लोकप्रिय व्हायला वेळ लागला नाही. याचे श्रेय या नाटकांच्या चमूला तर आहेच. मात्र, ज्याप्रमाणे दिग्दर्शक म्हणून चंद्रकांत कुलकर्णी यांनी ही सगळी टीम बांधली आहे, त्याला तोड नाही. मराठीतील हा अनोखा प्रयोग आहे.