Join us

LMOTY 2018: नक्षलवादी चळवळीचे कंबरडे मोडणारे डॉ. अभिनव देशमुख ठरले 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'चे मानकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 4:17 PM

दोन वर्षांपूर्वी गडचिरोलीसारख्या नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील आणि सतत युद्धजन्य परिस्थितीला तोंड द्यावे लागणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याची धुरा सांभाळण्याची जबाबदारी डॉ.अभिनव देशमुख यांच्यावर आली.

मुंबईः गडचिरोलीसारख्या अतिसंवेदनशील परिसरात नक्षलवादी कारवायांना पायबंद घालण्यासोबत स्थानिकांना नक्षली विचारसरणीपासून परावृत्त करण्याची उल्लेखनीय कामगिरी बजावणारे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव दिलीपराव देशमुख यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2018' या पुरस्काराने गौरवण्यात आले. राज्याचे मंत्री रणजित पाटील आणि अभिनेता निवेदिता सराफ  यांच्या हस्ते डॉ. अभिनव देशमुख यांच्या कुटुंबीयांनी हा सन्मान स्वीकारला.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराचं हे पाचवं पर्व आहे. राजकारण, समाजसेवा, कला, क्रीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिलेदारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. मान्यवर परीक्षकांनी केलेलं मूल्यमापन आणि वाचकांचा कौल या आधारे हा विजेता निश्चित करण्यात येतो. वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये सुरू असलेल्या दिमाखदार सोहळ्यात अभिनव देशमुख यांना मानाच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 

नक्षलवादी चळवळीचा पाया खिळखिळा करणारा पोलीस अधिकारी  

दोन वर्षांपूर्वी गडचिरोलीसारख्या नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील आणि सतत युद्धजन्य परिस्थितीला तोंड द्यावे लागणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याची धुरा सांभाळण्याची जबाबदारी डॉ.अभिनव देशमुख यांच्यावर आली. नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांना रोखणे, त्यांचे नेटवर्क उद्ध्वस्त करून त्यांचे मनसुबे हाणून पाडणे, भरकटलेल्या युवक-युवतींना नक्षलवादी चळवळीपासून दूर नेऊन, आत्मसमर्पणाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनाची नवी सुरुवात करणे अशी विविध आव्हाने त्यांच्यापुढे होती. ते त्यांनी समर्थपणे पेलण्यासोबतच इतरही अनेक उपक्रम राबविले. पोलीस विभागाच्या पुढाकारातून जागोजागी जनजागरण मेळावे घेऊन, शासनाच्या विविध विभागांच्या प्रतिनिधींना त्यात सहभागी करून, शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना दिली जाते. जून २०१६ मध्ये डॉ.देशमुख यांनी पदभार स्वीकारल्यापासून असे ३८५ जनजागरण मेळावे घेण्यात आले. याशिवाय सदर मेळाव्यादरम्यान शासकीय खर्चातून २७८ जोडप्यांचे विवाहसुद्धा लावून देण्यात आले. ग्रामीण भागातील शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ‘महाराष्ट्र दर्शन’ ही सहल घडवून बाहेरील प्रगती, संस्कृतीचे दर्शन घडविले जाते. यात गेल्या दोन वर्षांत ७ सहलींचे आयोजन करून, ५७७ विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची सहल घडविली. त्यात २५ नक्षल्यांचे नातेवाईक व २८ नक्षलपीडित पाल्यांचाही समावेश होता. याशिवाय डॉ. देशमुख यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्याच्या सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळावी, म्हणून ५ जानेवारी २०१८ रोजी पोलीस विभागाच्या पुढाकारातून गडचिरोलीत रोजगार मेळावा घेतला. या माध्यमातून जिल्ह्यातील 824 तरूणांना विविध कंपन्यांत रोजगार मिळाला. वर्षभरात नक्षल्यांकडून दोन वेळा सप्ताह पाळला जातो. या दरम्यान, नक्षल्यांचे मनसुबे साध्य होऊ नये आणि नागरिकांमधील दहशत कमी व्हावी, यासाठी डॉ. देशमुख यांच्या संकल्पनेतून सर्व उपविभागीय स्तरावर शांती मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले. त्यालाही नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे आज गडचिरोलीतील नक्षल चळवळ बऱ्यापैकी नियंत्रणात येऊन सामान्य नागरिकांना भयमुक्त जीवन जगण्यास मदत होत आहे.

टॅग्स :लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८पोलिस