मुंबई : राष्ट्राराष्ट्रातील, जाती-धर्मातील भेदभाव दूर व्हायला हवेत. माणूस जन्माला येतो तेव्हा त्याला कुणी त्याची जात विचारली तर तो मनुष्य हीच सांगेल. त्यामुळे मानवता हाच धर्म आहे, याचा विसर नको, असे उद्गार ख्यातनाम समाजसुधारक आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी बुधवारी काढले.लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द पुरस्कार सोहळ्यात सामाजिक कार्याकरिता जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केल्यावर आणि मानपत्र प्रदान केल्यानंतर धर्माधिकारी बोलत होते. उपस्थित हजारो अनुयायांनी त्यांना आपल्या जागी उभे राहून मानवंदना दिली. त्यांच्या प्रत्येक वाक्याला उपस्थित अनुयायी टाळ्यांचा कडकडाट करीत होते. धर्माधिकारी म्हणाले, आरोग्य शिबीरे, वृक्षारोपण व संवर्धन, स्मशानभूमी नूतनीकरण, स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आदी कामे धर्माधिकारी प्रतिष्ठान करीत आहे. मी कुणी महाराज नाही. मी सर्वसामान्य माणूस असून चांगले विचार देण्याचे काम मी करतो. मनुष्य म्हणून जन्माला आलेल्या माणसाचे कार्य काय, याची जाणीव मी करून देतो.आपण आपल्या अनुयायांना संत वाङमयाचा अभ्यास करण्याचा सल्ला देतो. आपण ज्या देशात राहतो त्याचे ऋण फेडण्याकरिता काय केले पाहिजे ते सांगतो. द्वेष, परस्पर तिरस्कार अंत:करणातून काढून टाकणे, मतभेद दूर करणे हे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.राष्ट्र सुधारण्याकरिता आपला सहभाग काय, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. सर्व शासनाने करावे ही अपेक्षा चुकीची आहे. राष्ट्र समृद्ध करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आम्ही झाडे लावण्याचे काम करतो, तेव्हा फक्त झाड कसे लावावे, हे सांगत नाही, तर त्याची जोपासना शिकवतो. त्याचपद्धतीने सुसंस्कारी समाज निर्माण व्हावा, यासाठी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे आम्ही प्रयत्न करत गेलो. जीवनाच्या शेवटापर्यंत आम्ही माणूसपण जपण्याचे हे काम याचपद्धतीने करत राहू, असे भावपूर्ण उद्गारही आप्पासाहेबांनी काढले.
LMOTY 2019: मानवता हाच धर्म याचा विसर नको - धर्माधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 8:13 AM