लॉकडाऊन काळात लाखो प्रवासी मजुरांना त्यांच्या राज्यात सुखरुप पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतलेल्या अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याला आज 'लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यावेळी सोनू सूदनं मुलाखतीत विविध मुद्द्यांवर आपलं मत मांडलं. महाराष्ट्राशी असलेलं नातं सांगतानाच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबाबतही सोनू सूदनं मोठं विधान केलं. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अतिशय प्रमाणिक आणि नम्र व्यक्ती असल्याचं सोनू सूदनं म्हटलं आहे. (Actor Sonu Sood Praises CM Uddhav Thackeray)
अभिनेता सोनू सूद याच्या मुंबईतील हॉटेलवर मुंबई महापालिकेनं कारवाई केली होती. त्यानंतर सोनू सूदनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली होती. याबाबत सोनू सूदला विचारण्यात आलं असता त्यानं मुख्यमंत्री ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
सोनू सूदचा महाराष्ट्रातील आवडता नेता कोण? उत्तरानं सर्वच झाले अवाक्
"माझ्या हॉटेलवर झालेली कारवाई मला मान्य आहे. जे चूक आहे ते चूक आहे. पण मी ते अनधिकृत बांधकाम केलेलं नाही. गेल्या २२ वर्षांपासून ती इमारत तशीच होती. मी त्याची साधी खिडकी सुद्धा बदलली नव्हती", असं सोनू सूद त्याच्या हॉटेलवर झालेल्या कारवाईबाबत म्हणाला. त्यानंतर मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या भेटीचाही अनुभव सोनू सूदनं सांगितला. "राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी खरंच चांगली गोष्ट होती. त्यांनी मला खूप प्रेम दिलं. आदित्य ठाकरेंनीही माझं आनंदानं स्वागत केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अतिशय प्रामाणिक व नम्र आहेत. दोघंही खूप कमाल आहेत. उद्धव ठाकरेंशी भेटून खूप सकारात्मकता मिळाली आणि हे मी याआधीही अनेकदा सांगत आलोय", असं सोनू सूद म्हणाला. त्यासोबतच मी जे काही बोलतो ते मनापासून आणि जे खरं आहे तेच बोलतोय, असंही सोनू सांगयला विसरला नाही.
महाराष्ट्रातील आवडता नेता कोण? महाराष्ट्रातील आवडता नेता कोण? असा प्रश्न सोनू सूदला विचारला असता त्यानं सुरुवातीला या प्रश्नानं आपण संकटात पडल्याच मिश्किलपणे म्हटलं. पण थोडा वेळ घेऊन विचाराअंती सोनू सूद यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव घेतलं. शरद पवार हे महाराष्ट्रातील माझे आवडते नेते असल्याचं सोनू सूद म्हणाला.
महाराष्ट्रातील आवडता पदार्थ कोणता?सोनू सूदला महाराष्ट्रातील आवडता पदार्थ विचारल्यानंतर त्यानं वडापाव, पोहे, पुरणपोळी अशा नावं घेतली खरी पण मिसळपाव आठवताच त्याला नागपूरची आठवण झाली. "नागपूरच्या शंकरनगर येथील मिसळ मी कधीच विसरू शकत नाही. मी कॉलेजला असताना शंकरनगरच्या त्या छोट्याशा मिसळ स्टॉलवर आवर्जुन जायचो. तो स्टॉल आजही तसाच आहे. मला जर वेळ मिळाला तर नक्की नागपूरला मिसळ खाण्यासाठी जाईन", असं सोनू सूद म्हणाला.
संपूर्ण मुलाखत पाहा...