LMOTY 2020: उद्याच्या भारताच्या सक्षम निर्मितीची! ‘स्मॉल टाउन इंडिया’मध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती, चमकदार नजर 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 03:04 AM2021-03-23T03:04:11+5:302021-03-23T03:04:31+5:30

लोकमतच्या व्यासपीठावर दोन पिढ्यांच्या यश-रहस्याचा शोध

LMOTY 2020: Competent creation of tomorrow's India! Indomitable willpower, bright look in ‘Small Town India’ | LMOTY 2020: उद्याच्या भारताच्या सक्षम निर्मितीची! ‘स्मॉल टाउन इंडिया’मध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती, चमकदार नजर 

LMOTY 2020: उद्याच्या भारताच्या सक्षम निर्मितीची! ‘स्मॉल टाउन इंडिया’मध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती, चमकदार नजर 

Next

मुंबई : ‘हायर अँड फायर’ ही संस्कृती या देशाच्या गुणसुत्रांशी जुळणारी नाही.  कामगारांबरोबरचा सलोखा टिकवूनच भारतीय उद्योग प्रगती करू शकतील, असे मत व्यक्त करणारे जेएसडब्ल्यू ग्रुपचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल... बदलत्या तंत्रज्ञानामुळे उत्पादक-विक्रेते-ग्राहक यांच्यातल्या बदलत्या नात्याची नस जोखून त्यावर नेमके बोट ठेवणारे ‘पेटीएम’चे संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी विजयशेखर शर्मा... 

देशातल्या परिवर्तनाच्या दोन पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणारे  हे दोन उद्योजक एकत्र येतात तेव्हा काय घडते? उलगडते ‘भारत’ नावाच्या सतत बदलत्या आणि तरीही आपल्या मुळांशी पक्क्या असलेल्या एका विलक्षण देशाची कहाणी! नुकत्याच संपन्न झालेल्या “लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर”च्या प्रतिष्ठित  व्यासपीठावर लोकमत वृत्तसमूहाचे अध्यक्ष विजय दर्डा यांनी  या दोघांना  बोलते केले, तेव्हा गप्पा रंगल्या “स्मॉल टाऊन इंडिया”मध्ये ठासून भरलेल्या जिद्दीच्या! दोघातला एक जुन्या ‘ब्रिक अँड मॉर्टर’पद्धतीच्या पारंपरिक उद्योगांचे प्रतिनिधित्व करणारा आणि दुसरा नवतरुण तंत्रज्ञानाच्या लाटेवर मांड ठोकून नवनिर्मिती करणारा!  

पिढ्या वेगळ्या, उद्योग-व्यवसाय वेगळे, तरी दोघांमध्ये एक गोष्ट समान दिसली - त्यांचे लहानशा शहरातले बालपण-तारुण्य, 
जगावेगळे काहीतरी करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि दुनियेकडे पाहण्याची नितळ चमकदार नजर! काळाच्या दोन वेगळ्या तुकड्यांतला भारत त्यांच्या तोंडुन सांगत होता एकच गोष्ट : उद्याच्या भारताच्या सक्षम निर्मितीची!

घर से दूर आया हूं तो...
खुर्दबुद्रुक स्मॉल टाऊन इंडियाच्या यशाची गोष्ट, हा दोघांमधला समान दुवा! सज्जन जिंदाल म्हणाले, ‘मी हिस्सारचा आणि विजयशेखर अलीगडजवळच्या गावचा. आम्ही दोघेही स्मॉलटाऊन बॉइज.  आमच्यासारखे गाव-शहरातले तरुण जेव्हा कामांसाठी मोठ्या शहरात येतात, तेव्हा सोबत असतात आमच्या महत्वाकांक्षा. डोक्यात फक्त एकच असतं, घर से दूर आया हूं तो मुझे बहौत तरक्की करनी है!’
विजय शेखर म्हणाले, ‘अलीगढजवळच्या लहानशा गावात मी शिकत होतो, तेव्हा शिकून नोकरी काय तर सरकारी एवढंच लोकांना माहिती होतं. त्याकाळी वडिलांच्या मित्राकडे एक पुस्तक होतं "आफ्टर टेन प्लस टु, व्हॉट? आधी सरकारी मग बँका, मग खासगी क्षेत्र, मग परदेशी जा... जे दिसतं तेच विकलं जातं. अगदी अलीकडच्या काळातही कुणी स्टार्टअप मध्ये काम करायला तयार नसे. पण आता चित्र बदलतं आहे. नोकऱ्यांचे प्रकारच बदलत आहेत.’

Web Title: LMOTY 2020: Competent creation of tomorrow's India! Indomitable willpower, bright look in ‘Small Town India’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Lokmatलोकमत