मुंबई : वर्षभरापूर्वी जेव्हा कोरोना संकटामुळे लॉकडाऊन (Lockdown) सुरु झाला तेव्हा अमरावतीमधील लोकांमध्ये भय मोठ्याप्रमाणावर दिसून आले. मालेगाव हे संवेदनशील शहर आहे. यामुळे तिथे नियंत्रण मिळविणे खूप कठीण आणि गरजेचे होते. आम्ही कोरोना काळात मालेगावमध्ये खूप काम केले, लोकांना परिस्थिती समजावत कोरोनावर नियंत्रण मिळविल्याचे अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी सांगितले. (After situation overviews will decide on lockdown removal in Amravati: CP Aarti Singh)
आरती सिंग यांना यंदाचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्ड 2020' (Lokmat Maharashtrian of the year award 2020) देण्यात आला. यावेळी त्यांनी कोरोनाकाळात परिस्थिती कशी सांभाळली हे सांगितले. तसेच पोलिसांनी खूप मेहनत केली, परंतू यात आमचे काही पोलीस शहीद झाले. याचे मला अजूनही वाईट वाटते, असे सांगत आरती सिंग भावूक झाल्या.
कोरोना काळात महाराष्ट्र पोलिसांनी योद्ध्याप्रमाणे काम केले. यामुळे महाराष्ट्र पोलिसांची इमेज वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचली. अमरावतीमध्ये फेब्रुवारीपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आम्ही केलेल्या लॉकडाऊनला लोकांचाही चांगला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. सध्याच्या परिस्थितीवर अभ्यास सुरु आहे. त्यावरूनच अमरावतीतील लॉकडाऊन हटविण्याचा निर्णय घेतला जाईल, असे पोलीस आयुक्त आरती सिंग म्हणाल्या.
मुख्यमंत्र्यांचा दर दोन दिवसांनी फोन...मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दर दोन दिवसांनी फोन करून कोरोना परिस्थितीचा आढावा घेत होते. गृहमंत्री अनिल देशमुखांनीही खूप सहकार्य केले. आरोग्य मंत्री राजेश टोपेदेखील विचारपूस करायचे. या साऱ्यांच्या मदतीमुळे कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यास मदत झाल्याचे सिंग म्हणाल्या.