कोरोना काळात समाजाप्रति दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्ड २०२०'नं सन्मानित करण्यात आलं आहे. (Eknath Shinde Awarded Lokmat Maharashtrian of the Year Award 2020)
महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये नगरविकास मंत्रीपदाचं कामकाज पाहणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी लॉकडाऊन काळात परराज्यात परतणाऱ्या मजूरांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. अनेक मजुरांच्या दोन वेळचं जेवण आणि त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी अथक प्रयत्न केले. नगर विकास मंत्री या नात्यानं एकनाथ शिंदे यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, मीरा रोड, भाईंदर, वसई याठिकाणी रेकॉर्ड ब्रेक वेळेत जम्बो कोविड सेंटर उभारण्यासाठी प्रयत्न केले.
२०१४ साली एमएसआरडीसी सारख्या उपेक्षित विभागाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर देण्यात आली. त्यांनी आपल्या प्रशासकीय कौशल्यानं अनेक आधारभूत सुविधा एमएसआरडीसीकडे खेचून आणल्या आणि वेगानं कामं होतील यावर भर दिला. कोरोना काळात विविध क्षेत्रांमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल एकनाथ शिंदे यांची 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.