मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना कोरोना काळात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्ड २०२०' या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.
इकबाल सिंह चहल मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त असून मुंबईत कोरोना वेगानं पसरत असताना मे २०२० मध्ये चहल यांनी आयुक्तपदाची सूत्र हाती घेतली होती. इकबाल सिंह चहल स्वत: रुग्णालयात आणि कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या ठिकाणी जाऊन उपाययोजनांची माहिती घेताना दिसले होते. चहल यांच्या संकल्पनेतून कोरोना विरोधात 'चेस द व्हायरस', 'मिशन झिरो', 'फीव्हर क्लिनिक'सारख्या योजना यशस्वीरित्या राबविण्यात आल्या. मुंबईत मे २०२० मध्ये कोरोनाची स्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. पण इकबाल सिंह चहल यांच्या कुशल प्रशासकीय निर्णयांच्या मदतीनं मुंबईतील स्थिती आटोक्यात आणण्यात मदत झाली.
इतकंच नव्हे, तर आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या धारावीतील कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेनं केलेल्या कामाची विशेष दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली. धारावी पॅटर्नमध्ये इकबाल सिंह चहल यांचा सिंहाचा वाटा होता. राज्यातील पुणे महापालिकेनं देखील कोरोना प्रतिबंधक नियमांच्या व्यवस्थापनासाठी चहल यांचं मार्गदर्शन घेतलं.
कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी करण्यासाठीही चहल यांनी विशेष प्रयत्न केले. यासाठी चहल यांचा देश-विदेशातून अनेक पुरस्कारांनी सन्मान देखील करण्यात आला. यात इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या वतीनं दिला जाणारा 'आयएसीसी कोविड क्रूसेडर्स-२०२०' आणि रोटरी क्लब ऑफ मुंबईच्या वतीनं दिला गेलेल्या 'सिटिझन ऑफ मुंबई' या पुरस्कारांचा समावेश आहे. याच पद्धतीनं 'फेम इंडिया-२०२०' मध्ये देशभर ५० प्रभावशाली अधिकाऱ्यांच्या यादीतही चहल यांच्या कामगिरीचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना 'लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर' पुरस्कार देताना आम्हाला खूप आनंद होत आहे.