लॉकडाऊन काळात प्रवासी मजूरांसाठी 'देवदूत' ठरलेल्या अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याला आज 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. मुंबईत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सोनू सूदची मुलाखत घेण्यात आली. सोनू सूदनं लॉकडाऊनमधले किस्से, सामाजिक बांधिलकी, महाराष्ट्राशी जुळलेलं नातं, मुंबईतील स्ट्रगल आणि नागपूरशी जुळलेली नाळ अशा सर्व आठवणींवर मनमोकळेपणानं संवाद साधला. पण 'रॅपिड फायर राऊंड'मधील प्रश्नांना सोनू सूदनं दिलेल्या दिलखुलास उत्तरांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. (Sonu Sood Lokmat Maharashtrian Of The Year Award Interview)
महाराष्ट्रातील आवडता नेता कोण? महाराष्ट्रातील आवडता नेता कोण? असा प्रश्न सोनू सूदला विचारला असता त्यानं सुरुवातीला या प्रश्नानं आपण संकटात पडल्याच मिश्किलपणे म्हटलं. पण थोडा वेळ घेऊन विचाराअंती सोनू सूद यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव घेतलं. शरद पवार हे महाराष्ट्रातील माझे आवडते नेते असल्याचं सोनू सूद म्हणाला.
महाराष्ट्रातील आवडता पदार्थ कोणता?सोनू सूदला महाराष्ट्रातील आवडता पदार्थ विचारल्यानंतर त्यानं वडापाव, पोहे, पुरणपोळी अशा नावं घेतली खरी पण मिसळपाव आठवताच त्याला नागपूरची आठवण झाली. "नागपूरच्या शंकरनगर येथील मिसळ मी कधीच विसरू शकत नाही. मी कॉलेजला असताना शंकरनगरच्या त्या छोट्याशा मिसळ स्टॉलवर आवर्जुन जायचो. तो स्टॉल आजही तसाच आहे. मला जर वेळ मिळाला तर नक्की नागपूरला मिसळ खाण्यासाठी जाईन", असं सोनू सूद म्हणाला.
संपूर्ण मुलाखत पाहा...