मुंबई-राजकारणी म्हटले की, ते केवळ रस्ते, वीज, पाण्यासह विकासात्मक कामांच्या मागे धावणारे अशी सर्वसामान्यांची भावना; परंतु शाश्वत विकासाची दृष्टी असणारे राजकारणी हे बोटावर मोजण्याइतकेच असतात. त्यातील एक नाव असणारे आमदार डॉ. राहुल पाटील यांना 'मोस्ट प्रॉमिसिंग राजकीय व्यक्ती' या श्रेणीत 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. मुंबईत आज दिग्गजांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी या पुरस्कारासाठी मोस्ट प्रॉमिसिंग राजकीय व्यक्ती या श्रेणीत पाच जणांना नामांकन मिळालं होतं. या पुरस्काराचे मानकरी परभणीचे शिवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील ठरले आहेत. सामान्यांचे जगणे कसे सुकर होईल? मतदारसंघातील निराधार, विधवांसह सर्वसामान्य कुटुंबास हक्काचा रोजगार कसा मिळेल, यासाठी पदरमोड करणारे राजकारणी समाजसेवक म्हणून डॉ. राहुल पाटील यांची परभणीत ओळख आहे. बहुतांश नेत्यांना नागरिकांच्या मूलभूत सुविधा सोडविण्यातून वेळ मिळत नाही. अनेक जण स्वत:ला यातच गुरफटून घेतात. पण राहुल पाटलांनी हजारो नागरिकांचे खासगी प्रश्न वैयक्तिक पातळीवर पदरमोड करून सोडवल्याने अनेक कुटुंबं सक्षमपणे उभे राहिलेत. पक्षीय बंधने बाजूला सारून सर्व जातीधर्माच्या नागरिकांना रोजगार दिला.हजारो गरजू व्यक्तींना प्रशिक्षण कालावधीत घरून केंद्रापर्यंत तसेच केंद्रापासून ते घरापर्यंत मोफत प्रवास सुविधा उभारली. आरोग्याच्या दृष्टीने आतापर्यंत जवळपास दोन लाख नागरिकांना मोफत आरोग्य सुविधांसह सातत्याने आरोग्य शिबीर, मोतीबिंदू मुक्त मतदारसंघासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी घेतलेल्या दिव्यांगांच्या विवाह सोहळ्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली. मराठवाडा कृषी विद्यापीठात बाल वैज्ञानिकांसाठी विज्ञान संकुल उभारणीचे काम त्यांनी हाती घेतले आहे. याशिवाय महिलांसाठी स्वतंत्र सूतगिरणी उभारण्याचे कामही त्यांनी हाती घेतले आहे. आमदार डॉ.राहुल पाटील हे उच्च शिक्षित कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील माजी कुलगुरू, पत्नी आणि ते स्वत: एम.बी.बी.एस. आहेत.
LMOTY 2022: शाश्वत विकासाची दृष्टी! आमदार डॉ. राहुल पाटील ठरले 'मोस्ट प्रॉमिसिंग राजकारणी'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 8:30 PM