लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात येतं. यंदाचं या पुरस्कारांचं आठवं पुष्प. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठीची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली होती. यावेळी वैद्यकीय (डॉक्टर) मुंबई' या श्रेणीत पाच जणांना नामांकन मिळालं होतं. यात मुंबईचे कर्करोग शल्य चिकित्सक डॉ. मंदार नाडकर्णी (Dr. Mandar Nadkarni) हे पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा मंगळवारी मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला. यामध्ये लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना या पुरस्कारानं गौरवण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांसह सेलिब्रिटींनी पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली.
स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण भारतीय महिलांमध्ये आढळते. त्यात अनेकदा सर्जिकल कौशल्य वापरून स्तनांचे संवर्धन करून शस्त्रक्रिया करण्याची पद्धत डॉ. मंदार नाडकर्णी यांनी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध केली. स्तनाचा कर्करोग बळावल्यावर स्तन काढावे लागतात. मात्र, प्लास्टिक सर्जरी करून कृत्रिमरीत्या स्तन तयार केले जातात. त्यामुळे स्तनाची शस्त्रक्रिया झाल्याचे कळूनही येत नाही. त्यामुळे महिलांचा आत्मविश्वास टीकून राहतो. त्यांनी कर्करोग शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण टाटा मेमोरियल रुग्णालयात घेऊन अनेक वर्षे त्याच रुग्णालयात सेवा बजावली. स्तनाच्या कर्करोगाच्या ६००० शस्त्रक्रिया त्यांनी केल्या. २००९ साली ते अंधेरीच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात रुजू झाले, आजतागायत तिथे डॉ. नाडकर्णी यांनी २५०० हून अधिक स्तनाच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत.
सर्जिकल कौशल्यामुळे नाडकर्णी यांच्याकडे येणाऱ्या स्तनाच्या कर्करुग्णांपैकी ७० टक्के रुग्णांचे स्तन संवर्धन करून शस्त्रक्रिया केल्या आहेत. रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबातील जवळच्या सदस्यांचे समुपदेशन करून शस्त्रक्रिया समजावून सांगणारे डॉ. नाडकर्णी यांचे या शस्त्रक्रियावरील जागतिक दर्जाचे २१ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचे संपूर्ण वैद्यकीय शिक्षण मुंबई झाले असून, स्तन कर्करोगाच्या प्लास्टिक शल्यचिकित्सेचे प्रशिक्षण त्यांनी फ्रान्स येथील प्रसिद्ध अशा सेंटर ऑस्कर लॅम्ब्रेट लिली या संस्थेतून घेतले आहे.