LMOTY 2022: एकनाथ शिंदेंना नाना पाटेकरांचा परखड सवाल, शिवसैनिकांच्या मनातील भावना; सभागृहच शांत झालं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 12:11 PM2022-10-12T12:11:43+5:302022-10-12T12:42:33+5:30
एकनाथ शिंदे हे ४० आमदारांना घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर, गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवसेनेत दुफळी निर्माण झाली आहे
मुंबई - समाजाच्या विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करणारा ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ हा पुरस्कार सोहळा आज (मंगळवार, ११ ऑक्टोबर) मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे दिमाखात पार पडला. कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांच्या सन्मानासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महामुलाखतीने सोहळ्याची रंगत वाढवली. विख्यात अभिनेते नाना पाटेकर हे या दोन्ही दिग्गज नेत्यांची मुलाखत घेताना सुरुवातच टोकदार प्रश्नावरुन केली. मतदार म्हणून आम्हाला काही किंमत आहे की नाही? असा प्रश्न नानांनी केला आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. तसेच, शिवसेनेत पडलेल्या फुटीवरुनही नानांनी एकनाथ शिंदेपुढे गाऱ्हाणं मांडलं.
एकनाथ शिंदे हे ४० आमदारांना घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर, गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवसेनेत दुफळी निर्माण झाली आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसैनिक विभागला गेला. नाना पाटेकरांनी हाच मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर उपस्थित केला. शिवसेना दुभंगल्यामुळे केवळ पक्षच नाही तर आमची घरंही दुभंगली आहेत. भाऊ-भाऊ एकमकेांविरुद्ध उभारले आहेत, असे म्हणत नानांनी शिवसेना विरुद्ध शिवसेना वादावर प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी, सभागृहच शांत झाल्याचं पाहायला मिळालं.
‘एकनाथराव, राष्ट्रवादी, समाजवादी, काँग्रेस सगळे वेगळे पक्ष. पण, शिवसेना विभागली गेल्यानंतर आमची घरंही विभागली गेली. माझे वडील किंवा भावंड, मुलं यांच्यामध्ये दोन गट पडले आहेत. हे प्रकरण आता तुमच्यापर्यंत मर्यादित न राहता ते वाढत गेलं आहे. त्याचं का. करायचं आम्ही? तुमच्यातली भांडणं कदाचित उद्या मिटतील आमच्यातल्या भांडणांचं काय? तळागाळात, गावागावात ही भांडणं सुरु आहेत. पण आमच्यातल्या भांडणांचं काय करायचं?’, हा शिवसैनिकांच्या मनातील प्रश्न नानांनी विचारला. उद्या तुम्ही या कुटनितीला तुम्ही राजकारणाचं नाव द्याल, असेही नानांनी म्हटले. दरम्यान, नानांच्या या नाराजीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी काहीही उत्तर दिलं नाही. मात्र, हे का घडलं याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
शिवसेना वादावर काय म्हणाले एकनाथ शिंदे
"ज्या पक्षामध्ये आम्ही इतके वर्ष काम केलं. रक्त आटवलं, घाम गाळला आणि आयुष्यभर फक्त पक्ष एके पक्ष केलं. कधीही कुठंही घरादाराचा विचार केला नाही. घरातून निघालं की परत येऊ की नाही याची शाश्वती नसायची. इतकं सगळं करुनही जेव्हा कुठं चुकीचं घडू लागलं. पक्षाच्या प्रमुखांना निर्णय घेण्याचे अधिकार असतात. पण पक्षातील नेत्यांना सोबत घेऊन ते घ्यायचे असतात. पक्षाचं नुकसान होतंय आणि ते वाचवण्यासाठी जर आम्ही हा निर्णय घेतला असेल तर त्याच चुकीचं काहीच नाही. कारण आम्ही पाचवेळा विनंती केली होती. संधी आली होती पण दुर्दैवानं तसं केलं गेलं नाही. मी बाळासाहेबांचा, आनंद दिघे साहेबांचा कार्यकर्ता आहे त्यामुळे हे मोठं पाऊल उचललं", असं एकनाथ शिंदे म्हणाले.
सहनशक्ती संपली होती
काही गोष्टी सहन करण्याची मर्यादा असते पण पाणी डोक्यावरुन जातं तेव्हा निर्णय घ्यावा लागतो. आम्ही जे केलं त्यामुळे आम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटल्या असं नाहीये नाना, असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'लोकमत' आयोजित 'महाराष्ट्राची महामुलाखत'मध्ये अभिनेते नाना पाटेकर यांच्यासमोर आपलं मन मोकळं केलं. शिवसेनेतून बंड करण्याची वेळ का आली यामागची भावनिक आणि राजकीय कारणं शिंदे यांनी यावेळी सविस्तर सांगितली. नाना पाटेकर यांनी आज लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. त्यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते.