Lokmat Maharashtrian of the Year Awards 2023: आज मुंबईतलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर, लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली. यावेळी अमोल कोल्हेंनी त्यांना मनसेच्या ब्लु प्रिंटबद्दल प्रश्न विचारला.
यावेळी अमृता फडणवीस यांनी राज ठाकरेंना विचारलं होतं की, एक दिवसाचा मुख्यमंत्री झाल्यावर काय कराल? त्याच प्रश्नाला पुढे नेत अमोल कोल्हे म्हणाले की, 2014 मध्ये तुम्ही मनसेची ब्लु प्रिंट मांडली होती. तुम्ही त्यात अतिशय सुंदर पद्धतीने समस्यांची मांडणी केली, कारण मिमांसा केली आणि त्यावर उपाययोजना काय हवी, हे मांडले. या ब्लु प्रिंटच्या अंमलबजावणीसाठी किंवा राजकीय साक्षरतेसाठी राज ठाकरे पुढाकार घेणार का?
यावर राज ठाकरे म्हणाले, ती ब्लू प्रिन्ट 2014 ला मांडली होती. काळानुरुप त्यात बदल करण्याची गरज आहे. मी 2006 साली माझ्या जाहीर सभेत त्या ब्लू प्रिन्टचा विषय मांडला होता. महाराष्ट्राची ब्लू प्रिन्ट मांडेन, असं मी तेव्हा म्हणालो होतो. नंतरच्या काळात मी राज्यात फिरलो. तेव्हा राज्यातील सगळे पत्रकार माझी चेष्ठा करायचे. ब्लू प्रिन्ट कुठंय, काय झालं त्याचं, असं विचारयचे.
जेव्हा मी ब्लू प्रिन्ट मांडली, तेव्हापासून आजपर्यंत एकाही पत्रकाराने मला प्रश्न विचारला नाही, ब्लू प्रिन्टचं काय झालं? यावेळी राज ठाकरेंनी एक रंजक किस्साही सांगितला. ते म्हणाले, मागे एका पत्रकाराने मला विचारलं होतं, तुमची ब्लू फिल्म आली होती, त्याचं काय झालं. मी त्याला म्हणालो, ब्लू फिल्म काढली असती तर बरं झालं असतं, तुम्ही पाहिली तरी असती. ब्लू प्रिन्ट शेवटपर्यंत पाहिली नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
अमोल कोल्हे पुढे म्हणाले की, राज ठाकरे अचूक टायमिंगसाठी ओळखले जातात. पण, ज्या दिवशी तुम्ही ब्लू प्रिन्ट मांडली, त्या दिवसी भाजप-शिवसेनेची युती तुटली. त्यामुळे मीडिया अटेंशन त्या घटनेवर गेले. राज म्हणाले, त्या दिवशी घटस्थापना होती. मला त्या दिवशीच ब्लु प्रिंट मांडायची होती. पण, मला काय माहित त्या दिवशीच त्यांचे(भाजप-शिवसेना) घट बसतील...असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.