महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुरस्कार सोहळा असा नावलौकिक मिळवलेल्या, 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कारां'चा भव्य सोहळा २६ एप्रिल २०२३ रोजी वरळीतील एनएससीआय डोममध्ये पार पडला. यावेळी निरनिराळ्या क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि बँकर, तसंच समाजसेविका अमृता फडणवीस यांनी मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिलं.
मुलाखतीदरम्यान अमृता फडणवीस यांनी त्यांना शिवसेनेची धुरा तुमच्या हाती असती तर आजची परिस्थिती वेगळी असती का असा सवाल केला. यावर त्यांनी दिवार चित्रपटातील एक संवाद बोलत मिश्किलपणे उत्तर दिलं. “मी तो विषय बंद करून टाकला आहे. मी धुरा सांभाळली असती तर काय झालं असतं अशा गोष्टींना आता काही अर्थ नाही. ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या समोर आहेत. जे सांभाळतायत ते सांभाळतील. मी माझा पक्ष काढलाय तो चालवतोय,” असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. मी एक पक्ष स्थापन केलाय. माझं मी काय करतोय ते मला माहितीये. मला अजून कोणाच्या धुरा व्हायचं नाहीये, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
म्हणूनच हजरजबाबीपणा आला“मी कोणत्याही जाणीवेनं भाषण नाही करत. घरात जे वातावरण अनुभवायला मिळालं. बातमीतून व्यंगचित्र कसं शोधावं, बातमी कशी वाचावी, व्यंगचित्र किती मोजक्या शब्दांत मांडलं पाहिजे, तो अभ्यास माझ्या भाषणाला महत्ताचा ठरतो. एखाद्या गोष्टीकडे नेमकं पाहणं, कुठेतरी घरंगळत न जाणं त्यातून आलं असावं. भाषणात माझ्या मनाला वाटतं ते मी बोलतो. कदाचित माझ्यात हजरजबाबीपणा आला असेल,” असं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले.