महाराष्ट्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळा बुधवार २६ एप्रिल रोजी संपन्न होत आहे. या पुरस्कार सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव होणार आहे. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय हवाई वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचीही या सोहळ्यात विशेष उपस्थिती असणार आहे. दरम्यान, पुरस्कार सोहळ्यादरम्यान ज्योतिरादित्य यांच्याशी गप्पांची मैफिल रंगणार असून, महाराष्ट्रातील मातीशी मूळ असलेले ज्योतिरादित्य शिंदे यावेळी काय आठवणी जागवतात, याबाबत उत्सुकता आहे.
महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुरस्कार सोहळा असा नावलौकिक मिळवलेल्या, 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कारां'चा भव्य सोहळा २६ एप्रिल २०२३ रोजी वरळीतील एनएससीआय डोममध्ये रंगणार आहे. ग्वाल्हेरमधील शिंदे राजघराण्याचे वंशज असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांना राजकारणाचं बाळकडू हे त्यांच्या कुटुंबातूनच मिळालेलं आहे. त्यांचे वडील माधवराव शिंदे हे देशातील प्रभावशाली नेते होते. त्यांच्या अकाली निधनानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. तसेच ते ग्वाल्हेर लोकसभा मतदारसंघातून चार वेळा निवडून आले होते. सध्या ते केंद्र सरकारमध्ये हवाई वाहतूक मंत्री म्हणून काम पाहत आहेत. आता या सोहळ्यात ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत त्यांच्या मंत्रालयाची कामगिरी, सध्याचं देशातील राजकारण, महाराष्ट्राशी असलेले ऋणानुबंध याबाबत गप्पा रंगणार आहेत.
लोकसेवा/समाजसेवा, प्रशासन, राजकारण, शिक्षण, कृषी, उद्योग, क्रीडा या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राचा झेंडा देशातच नव्हे तर जगात फडकवणाऱ्या गुणवंतांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारानं गौरवण्यात येतं. या सोहळ्यातील अनेक मुलाखती 'सुपरहिट' ठरल्यात. यावर्षी सोहळ्यात राज ठाकरे यांची महामुलाखत होणार असल्याचं जाहीर झालं होतं, पण ती कोण घेणार हे गुलदस्त्यात होतं. मात्र, डॉ. अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस हे दोघं राज ठाकरे यांचं अंतरंग उलगडून दाखवणार असल्याचं निश्चित झालं आहे. काही टोकदार, तर काही 'गुगली' प्रश्नांना राज कसे सामोरे जाणार आणि त्यातून कोणती 'राज की बात' उघड होणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे.