राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर, लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात येते. यंदा म्हणजेच २०२३ च्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' व्हिजनरी इंडस्ट्रियलिस्ट या विशेष पुरस्काराचे मानकरी दिग्गज उद्योजक आणि आदित्य बिर्ला समूहाचे प्रमुख कुमार मंगलम बिर्ला ठरले. यानंतर लोकमत मीडियाचे सहव्यवस्थापकीय आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी दिग्गज उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली.
कुमार मंगलम बिर्ला यांनी यापूर्वी व्होडाफोन आयडियाच्या संचालक मंडळातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतु नुकतंच त्यांनी व्होडाफोन आयडियाच्या संचालक मंडळात ॲडिशनल डिरेक्टर म्हणून येण्याचा निर्णय घेतला. यावरही मुलाखतीदरम्यान त्यांनी भाष्य केलं. “आम्हाला कंपनीमध्ये काही संधी दिसत आहेत. खासगी क्षेत्रातील तीन कंपन्या दूरसंचार क्षेत्रात असाव्या असं सरकारचंही स्पष्ट मत आहे. या क्षेत्रातील अन्य दुसऱ्या दोन कंपन्या चांगलं काम करत आहेत. व्यवसायाला पुढे नेणं ही माझीदेखील एक जबाबदारी आहे. म्हणूनच मी परत संचालक मंडळावर येण्याचा निर्णय घेतला,” असं कुमार मंगलम बिर्ला म्हणाले.
व्यवसायात ग्रोथ महत्त्वाची“कोणत्याही व्यवसायात ग्रोथ ही महत्त्वाची असते,” असं मत कुमार मंगलम बिर्ला यांनी मुलाखतीदरम्यान व्यक्त केलं. यावेळी त्यांनी आपली एक आठवणही सर्वांसोबत शेअर केली. “मी व्यवसायात खूप लवकर आलो. माझ्या वडिलांनी कोलकात्यात एक युनिट सुरु केलं होतं. ते त्यांचं पहिलं युनिट असल्यामुळे त्यांच्या मनाच्या फार जवळ होतं. त्यात आम्हाला पुढे नुकसानही होऊ लागलं. ते चालवणं कठीण होतं. ते बंद करावी किंवा विकावं अशी परिस्थिती आली होती. यानंतर आम्हाला इमोशनल डिसिजन घ्यावं लागलं. त्यानंतर आम्ही दोन्ही युनिट विकल्या. माझ्या आईनं खूप पाठिंबा दिला. अशी परिस्थिती अनेकदा आली जेव्हा आम्हाला कठीण निर्णय घ्यावे लागले,” असं बिर्ला म्हणाले.