राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर, लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात येते. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठीची नामांकने नुकतीच जाहीर करण्यात आली होती. शिक्षक या श्रेणीत नागपूरचे धनंजय पकडे, अकोल्याचे राजेश कोगदे, सोलापूरचे राम गायकवाड, बीडच्या उषा करपे आणि पुणे जिल्ह्यातील संतोष दळवी या पाच जणांना नामांकन मिळाले होते. यंदा म्हणजेच २०२३ च्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ढेकणमोहा, तालुका बीडच्या सहशिक्षिका उषा अप्पासाहेब ढेरे-करपे यांना प्रदान करण्यात आला.
बीड तालुक्यातील ढेकणमोहा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकेकाळी नामांकित शाळा होती. पंचक्रोशीतील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत. कधी काळी ७००-८०० विद्यार्थी, १४ - १५ शिक्षक असलेल्या शाळेला उतरती कळा लागली. विद्यार्थीपट घसरून पहिली ते चौथीची विद्यार्थी संख्या ७ एवढीच राहिली. शाळा शेवटच्या घटका मोजू लागली. २०१८ साली ऑनलाइन बदल्यानंतर उषा बप्पासाहेब ढेरे रुजू झाल्या. ढेकणमोहा गावकऱ्यांनी शालेय समिती सदस्यांच्या मदतीने प्रत्यक्ष घरोघरी जाऊन, लोकांची बोलणी ऐकून, हेटाळणी, शाळेविषयी नकारात्मक भावना हे सगळे पचवून पहिल्या दिवशी १० प्रवेश मिळवले आणि सुरू झाली सावित्रीच्या लेकींची शाळा.
आज पाचव्या वर्षी विद्यार्थी संख्या ५ वरून ६६ झाली आहे. पालकांचा व्हॉट्सॲप ग्रुप बनवून शाळेत मुले टिकविण्याची किमया साधली. आतापर्यंत एकूण २६०० शैक्षणिक व्हिडीओ यूट्यूबवर ढेरे उषा या चॅनलवर अपलोड आहेत. त्याला २२ कोटी प्रेक्षक आहेत. आज यूट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राने ढेकणमोहाची शाळा पाहिली. उषा ढेरे यांना आतापर्यंत विविध १५ पुरस्कार मिळाले आहेत. स्वलिखित तीन शैक्षणिक पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा मंगळवारी मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला. यामध्ये लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना या पुरस्कारानं गौरवण्यात आले.