महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी घेतलेली महामुलाखत गल्लीपासून दिल्लीपर्यंत गाजली होती. आता पुन्हा एकदा या दोन नेत्यांची मुलाखत खास ठरणार आहे. कारण, या जोडगोळीला प्रश्न विचारणार आहेत, त्यांचे दोन कट्टर राजकीय विरोधक. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार' या भव्य सोहळ्यात यावर्षी शिंदे-फडणवीस जोडीचा आमना-सामना होणार आहे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या, टोले-टोमणे मारणाऱ्या या प्रतिस्पर्ध्यांमध्ये मुलाखत देणारे बाजी मारतात की मुलाखत घेणारे भारी पडतात, हे पाहणं औत्सुक्याचं आहे.
एकापेक्षा एक हटके मुलाखती ही 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर पुरस्कार' सोहळ्याची ओळखच बनली आहे. यावर्षीही ही परंपरा केवळ कायम राहणार नाहीए, तर या सोहळ्यात महामुलाखतींचा 'डबल धमाका'च होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची महामुलाखत लोकसभा खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि 'बँकर ते सिंगर' असा प्रवास करणाऱ्या अमृता फडणवीस घेणार आहेत. त्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्रितपणे प्रश्नांना सामोरे जाणार आहेत. गेल्या वर्षी नाना पाटेकर यांनी या दोघांना परखड सवाल केले होते. आमच्या मताला काही किंमत आहे का?, असा जनतेच्या मनातला प्रश्न नानांनी थेट विचारला होता. एकनाथ शिंदेंचं बंड, शिवसेनेचे ४० आमदार फुटणं, मविआचं सरकार पडून नवं सरकार स्थापन होणं या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या मुलाखतीला वेगळंच महत्त्व होतं.
आजचं राजकीय चित्र थोडं वेगळं आहे. चक्रावून टाकणाऱ्या घडामोडी, दावे-प्रतिदावे रोज सुरूच आहेत; पण सुप्रीम कोर्टाच्या निकालावर बरंच काही ठरणार आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघंही या निकालाची चातकासारखी वाट बघताहेत. म्हणूनच, सत्तापक्षातले दोन प्रबळ नेते आणि विरोधकांमधील दोन प्रमुख नेत्यांना 'लोकमत' आमनेसामने घेऊन येत आहे. शिंदे-फडणवीस आणि जयंत पाटील - नाना पटोले हे सगळेच मुरब्बी नेते आहेत. त्यांचा राजकीय अनुभव दांडगा आहे. बऱ्याचशा 'आतल्या गोष्टी', पडद्यामागच्या गोष्टी त्यांना माहीत आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीस विरुद्ध पाटील-पटोले हा मुकाबला चांगलाच रंगण्याची चिन्हं आहेत.
लोकसेवा/समाजसेवा, प्रशासन, राजकारण, शिक्षण, कृषी, उद्योग, क्रीडा या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राचा झेंडा देशातच नव्हे तर जगात फडकवणाऱ्या गुणवंतांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारानं गौरवण्यात येतं. २६ एप्रिल रोजी मुंबईत, वरळीच्या एनएससीआय डोममध्ये हा भव्य सोहळा होणार आहे. त्यात विविध क्षेत्रातील दिग्गजांसह बॉलिवूड सेलिब्रिटीही उपस्थित राहणार आहेत.