Lokmat Maharashtrian of the Year Awards 2023: वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर, लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरवण्यात येते. या पुरस्कारासाठीची नामांकने नुकतीच जाहीर करण्यात आली होती.
राजकारण (पदार्पण) (Debutant Politician) या श्रेणीत पाच जणांना नामांकन मिळाले होते. यंदाच्या म्हणजेच २०२३ च्या ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’च्या राजकारण (पदार्पण) क्षेत्रात अहमदनगरच्या कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे पुरस्काराचे मानकरी ठरले. त्यांना केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि आमदार सचिन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रोहित पवार बारामती जिल्हा परिषद सदस्य असतानाच होम ग्राउंड सोडून राष्ट्रवादी काँग्रेसने कर्जत-जामखेड या विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघात ठाण मांडून प्रत्येक गावाशी, तरुणांशी वैयक्तिक संबंध ठेवत त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विजय खेचून आणला. निवडून आल्यानंतर कर्जत- जामखेड एकात्मिक विकास फाउंडेशनच्या माध्यमातून या भागाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम सुरू केले आहे.
कर्जत- जामखेड हे दुष्काळी तालुके, मात्र हेच तालुके विकासाचा ब्रॅण्ड म्हणून पुढे आणण्यासाठी शासकीय निधी आणि सीएसआर निधीच्या माध्यमातून त्यांनी दुष्काळी तालुक्यांच्या विकासाचे मॉडेल तयार केले. या माध्यमातून मतदासंघातील पर्यटनाची माहिती सांगणारी ट्रॅव्हल सिरीज त्यांनी साकारली. अनेक उपक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून ते राबवत आहेत. राज्यातील पहिली आंतरविद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धा त्यांनी कर्जतमध्ये घेतली. शालेय मुलींवरील अत्याचाराच्या घटनेमुळे गाजलेल्या कोपर्डी गावात मुलींसाठी स्कूल बसची सेवा दिली. त्यांच्या या विविध कार्यासाठीच रोहित पवार यांना पुरस्कार देण्यात आला.