मुंबई - लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२३ चा भव्यदिव्य सोहळा दिमाखदार पार पडला. या सोहळ्याला केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अभिनेता, दिग्दर्शक रितेश देशमुख यांच्यासह दिग्गज नेते, सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या सोहळ्यात अभिनेता रितेशला लोकमतकडून विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यासाठी मंचावरून रितेश देशमुखचे नावही पुकारण्यात आले. मात्र यावेळी घडलेल्या एका प्रसंगाने सगळेच आश्चर्यचकीत झाले.
अभिनेता रितेश देशमुख यांचे नाव पुरस्कारासाठी पुकारले तेव्हा व्यासपीठावर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, लोकमत समुहाचे विजय दर्डा, राजेंद्र दर्डा उपस्थित होते. रितेश देशमुख स्टेजवर एकटाच आल्याचे पाहताच केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे स्वत: व्यासपीठावरून खाली उतरले आणि त्यांनी स्व. विलासराव देशमुख यांच्या पत्नी आणि रितेशची आई वैशाली देशमुख यांच्या हाताला पकडून स्टेजवर आणले. घडलेला हा प्रसंग पाहून अनेकांच्या टाळ्यांच्या गजरात वैशाली देशमुख यांचे व्यासपीठावर स्वागत केले. त्यापाठोपाठ रितेश देशमुख याची पत्नी अभिनेत्री जिनेलियाही मंचावर आली.
लोकमतकडून मिळालेला पुरस्कार हाती घेऊन रितेशने मनातील भावना व्यक्त केली. रितेश देशमुख म्हणाला की, ज्योतिरादित्य हे माझ्या मोठ्या बंधूसारखे आहेत. तुमचे प्रेम सदैव माझ्यासोबत आणि कुटुंबासोबत असतील. आपल्या दोन्ही कुटुंबाचे संबंध फार जुने आहेत. १९९९ साली पहिल्यांदा माधवराव शिंदे यांनी माझ्या वडिलांना महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री तुम्ही आहात असं म्हटलं होते. ती आठवण आणि प्रेम माझ्या कुटुंबासोबत सदैव राहील. मी तुमचा आभारी आहे असं त्याने सांगितले.
त्याचसोबत राज ठाकरे यांच्या हस्ते मला हा पुरस्कार मिळाला त्याचा आनंद. महाराष्ट्रासाठी तुम्ही प्रेरणादायी आहात. पण माझ्यासाठी आपली मैत्री फार जवळची आहे ती मी आयुष्यभर जपेन. लोकमत कुटुंबाचा मी अत्यंत आभारी आहे. मला हा पुरस्कार दिला त्याबद्दल धन्यवाद. खरे तर हा पुरस्कार महाराष्ट्रीयन ऑफ द इयरचा आहे. परंतु तो ज्यापद्धतीने देण्यात आला त्यामुळे मला Lifetime Achievement Award असल्याचं वाटलं अशी प्रतिक्रिया रितेश देशमुख यांनी व्यक्त केली.
पाहा व्हिडिओ