बुधवारी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार' सोहळ्यात राज ठाकरेंची मुलाखत अफलातून ठरली आहे. राज ठाकरे यांची राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस यांनी मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली. महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला.
मुलाखतीदरम्यान अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांना जर तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून सहा महिने दिले तर काय बदल कराल असा प्रश्न विचारला. यावर राज ठाकरेंनी आपल्याच शैलीत उत्तर दिलं. “सहा महिने, एक दिवस, पाच दिवस असं मला सांगता येणार नाही. माझ्याकडे अनेक गोष्टी आहेत ज्या सहज बदलण्यासारख्या आहेत. आपल्या देशात कायदे आहेत. लॉ आहे पण ऑर्डर नाही. ऑर्डरची गरज आहे आणि त्या सुरळीत होऊ शकतात. मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलिसांवर माझा शंभर टक्के विश्वास आहे. त्यांच्या हाती ४८ तास द्या आणि त्यांना सांगा मला महाराष्ट्र साफ करून द्या. सगळ्या गोष्टी त्यांना माहित असतात. ऑर्डर नसतात. पोलिसांनी भूमिका घेतल्यानंतर त्यांना जेलमध्ये जावं लागत असेल तर का जातील आणि कोणासाठी ते जेलमध्ये जातील. बसलेलाच माणूस टेम्पररी आणि त्याच्यासाठी आम्ही परमनंट जेलमध्ये जायचं याला काही अर्थ आहे का?” असा सवाल राज ठाकरे यांनी उत्तरादरम्यान केला.