Join us  

प्रकल्प रखडल्याने तिजोरीवर भार

By admin | Published: May 04, 2016 12:13 AM

महापालिकेमधील एकही प्रकल्प वेळेत पूर्ण होत नाही. रखडलेल्या कामांमुळे प्रकल्पांचा खर्च दुप्पट होत असून त्यामुळे अंदाजपत्रकही कोलमडू लागले आहे. ८३ कोटी रूपये खर्च करून

- नामदेव मोरे,  नवी मुंबई

महापालिकेमधील एकही प्रकल्प वेळेत पूर्ण होत नाही. रखडलेल्या कामांमुळे प्रकल्पांचा खर्च दुप्पट होत असून त्यामुळे अंदाजपत्रकही कोलमडू लागले आहे. ८३ कोटी रूपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या तीन रूग्णालयांवर जवळपास २०० कोटी खर्च झाले आहेत. २००९ मध्ये भूमिपूजन झाल्यानंतरही अद्याप रूग्णालये सुरू होवू शकली नाहीत. महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पहिल्याच बैठकीमध्ये पालिकेची सर्व कामे दिलेल्या मुदतीमध्येच पूर्ण होणार असल्याची घोषणा केली आहे. टाईमबाँडला महत्त्व देणार असल्याचे स्पष्ट करताच पालिकेच्या ठेकेदारांसह अनेक अधिकाऱ्यांच्याही पोटात गोळा उठला आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून अद्याप एकही प्रकल्प वेळेत पूर्ण होवू शकला नाही. सर्व महत्त्वाच्या प्रकल्पांना दिलेल्या मुदतीपेक्षा दुप्पट किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळ लागला आहे. प्रकल्प रखडल्यामुळे त्यांचा खर्च वाढत जात आहे. शहरवासीयांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने नेरूळ व ऐरोलीमधील माताबाल रूग्णालयाची इमारत पाडून तेथे प्रत्येकी १०० बेडचे सर्वसाधारण रूग्णालय व बेलापूरमध्ये जिल्हा परिषदेकडून हस्तांतर करून घेतलेल्या आरोग्य केंद्राच्या जागेवर ५० बेडचे माता बाल रूग्णालयाचे काम करण्याचा निर्णय महापालिकेने सात वर्षापूर्वी घेतला होता. २००९ मध्ये तीनही रूग्णालयांचे भूमिपूजन करण्यात आले. २०११ मध्ये रूग्णालय सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली. परंतु मे २०१६ सुरू झाले तरी अद्याप रूग्णालयांचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू झाले नाही. ठेकेदाराला दिलेल्या मुदतीपेक्षा दुप्पट वेळ बांधकामांना लागत असेल तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न शहरवासी विचारू लागले आहेत. महापालिकेच्या ऐरोली माता बाल रूग्णालयाचा ठेका २८ कोटी ११ लाख रूपयांना दिला होता. जुलै २०१५ पर्यंत हा खर्च ७४ कोटी ७४ लाख रूपये झाला. नेरूळ रूग्णालयाचा ठेका ३७ कोटी रूपयांना दिला होता. तो खर्चही ७२ कोटी ७४ लाख रूपये झाला. बेलापूरमधील ८ कोटी रूपयांच्या माता बाल रूग्णालयाचा खर्च २३ कोटी रूपयांवर गेला आहे. तीन रूग्णालयांसाठी ८३ कोटी खर्च होणार होते. परंतु २०११ मध्ये बांधकाम पूर्ण झाले नाही. परिणामी खर्चाचा आकडा वाढत जावून तो जुलै २०१५ पर्यंत १७० कोटी रूपये झाला आहे. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा गॅस पाइपलाइनचे कामासाठी तोडफोड करावी लागली. फर्निचर, रूग्णालयीन उपकरणे व इतर गोष्टींसाठी झालेला खर्च एकत्र केल्यानंतर तीन रूग्णालयांसाठी २०० कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्च झाला आहे. जवळपास तीनपट जास्त रक्कम खर्च होवूनही अद्याप शहरवासीयांना त्या रूग्णालयांचा लाभ होत नाही. नवीन आयुक्त आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार कसा सुधारणा याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ८३ कोटींचा खर्च १७० कोटींवर महापालिकेच्या तीन रूग्णालयांचे काम २००९मध्ये सुरू केले. तीनही रूग्णालयांच्या बांधकामाचा ठेका ८३ कोटी रूपयांना देण्यात आला होता. परंतु काम रखडल्याने २०१५ पर्यंत या कामासाठी १७० कोटी रूपये खर्च करण्यात आले. यानंतर वैद्यकीय साहित्य, फर्निचर व इतर कामांसाठी केलेला खर्च विचारात घेतल्यानंतर हा खर्च २०० कोटींहून जास्त झाला असून याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई कोण व कधी करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष शहरातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. तीन रूग्णालयांवर करोडो रूपये खर्च करून ती अद्याप सुरू होवू शकली नाहीत. कोपरखैरणे व तुर्भे माता बाल रूग्णालयांची इमारत धोकादायक झाली असल्याने रूग्णालयच बंद केले आहे. शहरवासीयांना नाईलाजाने जादा पैसे मोजून खासगी रूग्णालयांचा आधार घ्यावा लागत असून आयुक्त तुकाराम मुंढे आरोग्य विभागातील अनागोंदी थांबविणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्पील ओव्हर वाढतोय महापालिकेचे प्रकल्प वेळेत पूर्ण न केल्याने त्यांचा खर्च दुप्पट होत आहे. वाढलेल्या खर्चामुळे अर्थसंकल्पातील नियोजन पूर्णपणे कोलमडू लागले आहे. गतवर्षी पालिकेने सादर केलेल्या आर्थिक स्थिती अहवालामध्ये तब्बल १२९५ कोटी रूपयांचा स्पील ओव्हर असल्याचे स्पष्ट केले होते. यावर्षीही अर्थसंकल्प २ हजार कोटी रूपयांचा असला तरी स्पील ओव्हरमुळे प्रत्यक्ष नवीन कामांसाठी जास्तीत जास्त ४०० कोटी रूपये उपलब्ध होवू शकतात. पालिकेची कामे वेळेत झाली तरच स्पील ओव्हर कमी करणे शक्य होणार आहे.