एस.टी. बसगाड्यांचा बेस्टवर भार, इंधनापोटी मोजणार दोन कोटी ४२ लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 02:51 AM2021-02-03T02:51:54+5:302021-02-03T02:53:20+5:30
ST Bus News : सुरुवातीच्या काळात बेस्ट कर्मचारी मोठ्या संख्येने गैरहजर राहत असल्याने एस.टी.च्या जादा बसगाड्या बोलवण्यात आल्या होत्या.
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकल सेवा पूर्णतः बंद असल्याने बेस्ट उपक्रमावरील ताण वाढला होता. या काळात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसगाड्या बेस्टच्या मदतीला धाऊन आल्या होत्या. तर सुरुवातीच्या काळात बेस्ट कर्मचारी मोठ्या संख्येने गैरहजर राहत असल्याने एस.टी.च्या जादा बसगाड्या बोलवण्यात आल्या होत्या. या बसगाड्यांच्या इंधनापोटी झालेला खर्च आता महापालिकेला भरावा लागणार आहे. तब्बल दोन कोटी ४२ लाख रुपये खर्च एस.टी.ला देण्यात येणार आहे.
मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर २३ मार्च २०२० पासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्याकाळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू होत्या. मात्र रेल्वे सेवाही पूर्णतः बंद असल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचे काम बेस्ट उपक्रमाने केले. परंतु, कोरोनाच्या भीतीने बहुतांश बेस्ट कर्मचारी गैरहजर राहत होते. अशा वेळी एस.टी. महामंडळाच्या १२०० बसगाड्या व्यतिरिक्त आणखीन काही बसगाड्या मागवण्यात आल्या.
बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देत कामावर हजर राहण्याची ताकीद देण्यात आली होती. त्यानुसार १८ मे पासून बेस्ट कर्मचारी कामावर हजर झाले. परंतु, १७ मे २०२० पासून एस.टी. महामंडळाच्या ६४३ बसगाड्या बेस्ट आगारांमध्ये दाखल झाल्या होत्या. या बसगाड्यांच्या इंधनाचा सुमारे दोन कोटी ४२ लाख रुपये खर्च महामंडळाने बेस्ट प्रशासनाकडे मागितला आहे. त्यानुसार याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी मांडला आहे.