इंधन दरवाढीविरोधात मोर्चा; भाई जगताप यांच्यासह सर्वजण कोसळले जमिनीवर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ बैलगाडीवरून आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा भार असह्य झाल्याने बैलगाडी कलंडल्याची घटना अँटॉप हिलमधील भरणी नाका परिसरात शनिवारी घडली. सुदैवाने यात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.
पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅससह इंधन दरवाढीवरून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. त्यासाठी देशभरात सायकल रॅली, आंदोलने आणि निदर्शने केली जात आहेत. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्त्वात शनिवारी अँटॉप हिलमधील भरणी नाका परिसरात बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. अशाप्रकारे इंधन दरवाढ होत राहिल्यास बैलगाडीने फिरण्यावाचून पर्याय नाही, हे दर्शविण्याची योजना यामागे होती. मात्र, हा बैलगाडी मोर्चा काँग्रेसच्याच अंगाशी आल्याचे पहायला मिळाले.
मोर्चासाठी बैलगाडी तयार होती. भाई जगताप त्यात चढल्याबरोबर मागाहून पंचवीसेक नेतेवजा कार्यकर्ते बैलगाडीवर आरूढ झाले. एका कार्यकर्त्याने तर गॅस सिलिंडर हातात धरला. खालून छायाचित्रकार मंडळी भाई जगताप यांना तो सिलिंडर हातात घेण्याचा सल्ला देत होती. भाईंनी तसा प्रयत्न केलाही पण कार्यकर्त्यांच्या गर्दीपुढे त्यांना ते शक्य झाले नाही. इतक्यात ‘हमारा नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो’ ही घोषणा झाली, त्याबरोबर बैलगाडी मधोमध तुटली आणि भाई जगताप यांच्यासह सर्वजण खाली कोसळले.
बैलगाडीचे मोठे नुकसान
या प्रकारामुळे बैलगाडीचे मात्र मोठे नुकसान झाले. बैलांचा जू आणि गाडीला जोडणारा रॉड मधोमध तुटला. त्यामुळे त्याच्या डागडुजीचा खर्च मालकाच्या माथ्यावर पडला आहे. तर एका बैलालाही दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.