Join us

४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 6:09 AM

मुंबईत सुमारे ४०० सोसायट्यांच्या गच्चीवर होर्डिंग्ज आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर बेकायदा होर्डिंग्जचा मुद्दा चर्चेत आला असताना गृहनिर्माण सोसायट्यांच्या गच्चीवरील होर्डिंग्जचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईत सुमारे ४०० सोसायट्यांच्या गच्चीवर होर्डिंग्ज आहेत. 

नव्याने होर्डिंग उभारण्यास परवानगी देणे,  तसेच  परवान्यांचे नूतनीकरण करणे पालिकेने बंद केले असले, तरी ज्या सोसायट्यांच्या गच्चीवर होर्डिंग्ज उभारण्यात आले आहेत, त्या होर्डिंग्जच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे काय, ती सोसायटी किती जुनी आहे, होर्डिंगचा भार सहन करण्याइतपत सोसायटी भक्कम आहे का, इत्यादींचा आढावा मुंबई महापालिका घेणार काय, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. विविध जाहिरात कंपन्यांनी इमारतींवर होर्डिंग उभारले आहेत. त्यावरून अनेक सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांत वाद झाल्याच्या घटनाही घडल्या होत्या. 

कंपन्यांकडून मिळतो मेन्टेनन्सचा खर्च

होर्डिंग उभारण्यासाठी या कंपन्या सोसायटीला चांगला आर्थिक मोबदला देतात. काही कंपन्या तर सोसायट्यांचा  वर्षभराचा देखभाल (मेंटेनन्स) खर्चही देतात. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी परवानगी द्यावी म्हणून त्यांना भेटवस्तू देणे असे प्रकारही काही ठिकाणी घडलेले आहेत.  होर्डिंग उभारण्यास सोसायटीच्या कार्यकारिणीतील काही सदस्यांनी विरोध केल्यानंतर अन्य सदस्यांनी  बहुमताच्या जोरावर परवानग्या दिल्या आहेत. 

२०१४ मध्ये सीएसएमटी येथील हिमालय पूल कोसळल्यानंतर पालिकेच्या परवाना विभागाने सोसायटीच्या गच्चीवर होर्डिंग उभारण्यास  परवनगी देणे बंद केले. तसेच परवान्यांचे नूतनीकरण करणेही बंद  केले. या निर्णयास मुंबई होर्डिंग असोसिएशनने न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर न्यायालयाने पालिकेच्या निर्णयास स्थगिती दिली. 

मात्र, पालिकेने कोणत्याही इमारतीस नव्याने होर्डिंग उभारण्यास परवानगी देणे बंद केले आहे. सध्या फक्त इमारतीची  संरक्षक भिंत आणि आवारात होर्डिंग उभारण्यास परवानगी आहे. मुंबईच्या काही भागातील अनेक इमारती या ३० ते ४० वर्षे जुन्या आहेत. वाढत्या आयुर्मानात या इमारती होर्डिंगचा भार सोसण्यास सक्षम आहेत का, होर्डिंगमुळे  इमारतीवर भार येत आहे का, याचा आढावा घेण्याची वेळ आली आहे.

 

टॅग्स :घाटकोपरमुंबई