लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मालकी हक्काचे घर असूनही बिल्डरने भाडे थकविल्यामुळे झोपु योजनेतील लाखो थकबाकीदार झोपु रहिवाशांचे कंबरडे मोडले आहे. कर्ज काढत, दागिने विकून रहिवासी कसेबसे जगत आहेत. मात्र, झोपु प्राधिकरणाकडून निव्वळ घोषणाबाजी सुरू असून प्रत्यक्ष विकासकांवर कारवाई कधी होणार, आम्हाला थकीत भाडे कधी मिळणार, प्रकल्प पूर्ण होऊन हक्काचे घर कधी मिळणार, असे सवाल संतप्त थकबाकीदार झोपु रहिवाशांनी प्राधिकरणाला केला आहे.
झोपु योजनेत बिल्डरने प्रकल्प आणि भाडे रखडविल्यामुळे अशा विकासकांकडे ६२० कोटी रुपयांची भाडे थकबाकी आहे. प्राधिकरणाकडून ती अद्याप वसूल झालेली नाही. उलट प्राधिकरणाने या थकीत वसुलीची जबाबदारी कार्यकारी अभियंत्यांवर सोपवली आहे. शिवाय इरादापत्र व सुधारित इरादा पत्र जारी करण्याआधी संबंधित विकासकाने दोन वर्षांचे आगाऊ भाडे व योजना पूर्ण होईपर्यंतच्या धनादेश जमा केले आहेत की नाही, याची खात्री केलेली नाही.
न्यायालयाने कानउघाडणी केल्यावर थकबाकीदार बिल्डरांवर जोरदार कारवाई सुरू केल्याचे प्राधिकरणाकडून सांगितले जाते. प्रत्यक्षात बोटावर मोजण्या इतके प्रकल्प सोडले तर इतर कोणत्याही बड्या बिल्डर विरोधात झोपु प्राधिकरणाने कारवाई हाती घेतलेले नाही.
झोपु योजनेत ५१९ प्रकल्प रखडलेले
झोपु योजनेत ५१९ प्रकल्प रखडलेले आहेत. त्यातील बँकाच्या मदतीने वित्तीय सहकार्य करीत २७ प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे असले तरी मोठ्या प्रमाणात झोपु रहिवासी अजूनही थकीत भाड्याने हैराण आहेत.
रहिवाशांना न्याय कधी मिळणार ?
- वारंवार मोर्चा आणि आंदोलने करून आपल्या भाड्यासाठी सरकार दरबारी न्याय मागत आहेत.
- प्रत्यक्षात थकबाकीदार रहिवाशांना भाडे मिळालेले नाही.
- प्राधिकरणाच्या घोषणा ऐकण्यात काही रहिवाशांचे निधन झाले आहे, असे वांद्रे आणि जोगेश्वरी येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.