मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याला कर्ज; चतुर्वेदीला ईडीकडून नोटीस; पाटणकर यांनाही बोलावणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 10:55 AM2022-03-24T10:55:12+5:302022-03-24T10:55:31+5:30
पुष्पक ग्रुप ऑफ कंपनीतील पुष्पक बुलियन विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी ईडीकडून चतुर्वेदीच्या शोध सुरू
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना विनातारण कर्ज देणारा कथित हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदीच्या शोधासाठी ईडीचे पथक उत्तर प्रदेश येथे गेले होते. मात्र, तेथेही तो आढळला नाही. त्यामुळे ईडीकडून त्याच्या लोअर परळ येथील कार्यालयाबाहेर नोटीस बजावण्यात आली आहे. दुसरीकडे पाटणकर यांनादेखील चौकशीला बोलाविण्याची शक्यता आहे.
पुष्पक ग्रुप ऑफ कंपनीतील पुष्पक बुलियन विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी ईडीकडून चतुर्वेदीच्या शोध सुरू आहे. चतुर्वेदीने हमसफर डिलर प्रा. लि. कंपनी या बनावट कंपनीच्या माध्यमातून ३० कोटी रुपयांचे विनातारण कर्ज पाटणकरांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीत वळते केले. चतुर्वेदीशी संगनमत करून हा पैसा महेश पटेल याने लाटला आणि तो श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीच्या बांधकाम प्रकल्पात गुंतविण्यात आला. ईडीने पाटणकर यांच्या निलांबरी प्रकल्पातील ११ सदनिका जप्त केल्या आहेत.
ईडीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चतुर्वेदी व्यवसायाने सीए आहे, मात्र कोणतीही सीए फर्म चालवत नाहीत. ते बनावट कंपन्या चालवितात. चतुर्वेदी यांच्या एकाच पत्त्यावर दहापेक्षा अधिक बनावट कंपन्यांची नोंदणी तपास यंत्रणेला आढळली आहे. त्यांनी मुंबईसह कोलकाता आणि दिल्ली अशा विविध ठिकाणी बनावट कंपन्यांची स्थापना करून त्यांच्या माध्यमातून १५ ते २० वर्षांपासून काळा पैसा पांढरा करण्याचे काम करत असल्याचे बोलले जाते.
चतुर्वेदी यांच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील एका भूखंडाच्या व्यवहाराचीही मार्च २०२१ पासून ईडी आणि प्राप्तीकर खात्याकडून चौकशी सुरू आहे. मे २०२१ पासून ते आफ्रिकेतील एका देशात वास्तव्यास असल्याची सूत्रांची माहिती असून, ते श्रीधर पाटणकर यांना २००९ पासून ओळखत आहेत. त्यामुळेच ईडीला चतुर्वेदी यांच्याकडे चौकशी करायची आहे.
चतुर्वेदी विदेशात फरार?
नंदकिशोर चतुर्वेदी हे २४ हून अधिक कंपन्यांमध्ये संचालक म्हणून काम करत आहेत. यातील बहुतेक कंपन्या या बनावट असल्याचा संशय आहे.
चतुर्वेदी विदेशात पसार झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तो गेल्या काही महिन्यांपासून आफ्रिकेत असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबतही ईडीकडून तपास सुरू आहे.