मुंबई : महाविकास आघाडीच्या कर्जमाफी योजनेचा फायदा ३४ लाख शेतकऱ्यांना होणार असून, त्यांची नावानिशी यादी शासन जाहीर करणार आहे. या कर्जमाफी योजनेच्या स्वरूपाविषयी मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. एकूण कर्जमाफी ही २९ हजार ७१२ कोटी रुपयांची असेल.
३० सप्टेंबर, २०१९ पर्यंत दोन लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या सर्व शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होईल. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि राष्ट्रीयकृत बँकांनी या लाभार्थींच्या याद्या तयार केल्या असून, त्या शासनाच्या वेबसाइटवर १५ फेब्रुवारीपासून अपलोड करण्यात येणार आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईल. मे, २०२० पर्यंत ती पूर्ण करण्यात येईल.
देवेंद्र फडणवीस सरकारने दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले होते. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. कर्जमाफीच्या लाभार्थीसाठी जे निकष शासनाने निश्चित केले आहेत, त्या निकषात न बसणाºया शेतकºयांना कर्जमाफी दिली गेली, तर त्यासाठी संबंधित बँकेस जबाबदार धरण्यात येणार आहे. कर्जमाफीसाठी कुटुंब नव्हे, तर वैयक्तिक शेतकरी हा लाभार्थी असेल.