मुंबई- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेना-भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र राज्याला कर्जबाजारी केलं, शेतकऱ्यांच्यात निराशा पसरली आहे, असं भाजपाने 2014च्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं. पण काय वेगळं घडलं, महाराष्ट्राच्या डोक्यावरचं अडीच लाख कोटींचं कर्ज वाढलं आहे, शेतकरी निराश आहे, तो आत्महत्या करतोय, काय बदल झाला?, अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे. ते भांडुपच्या सभेत बोलत होते.
महापालिकेच्या शाळांतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या नोकरीत प्राधान्य हे आश्वासन होतं, काय झालं त्या आश्वासनाच?, आधुनिक तंत्र वापरून खड्ड्यांचा प्रश्न कायमचा निकालात काढणार?, कुठे गेलं तंत्रज्ञान? खड्डे पडत आहेत, कंत्राटदार कमवतोय, तरीही आपण प्रश्न विचारत नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी रस्त्यांवर पडत असलेल्या खड्ड्यांवरूनही शिवसेना-भाजपावर निशाला साधला आहे. पुढे ते म्हणाले, प्रत्येक निवडणुकीत नागरिकांच्या आयुष्यातील 5 वर्ष जातात, निवडणुकीत वाट्टेल ती आश्वासनं दिली जातात आणि पुढे लोकं विसरतात आणि लोकं पण प्रश्न विचारत नाहीत.