लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते बारावीचे वर्ग येत्या साेमवारपासून सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, शाळा सुरू करताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातील शाळा सुरू करत असताना स्थानिक जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी विचारविनिमय करून विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. या आदेशानुसार राज्यातील शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय अंतिम ठरणार आहे.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या असून मुंबई पालिका आयुक्तांचा निर्णय त्याच पार्श्वभूमीवर असल्याचे त्यांनी म्हटले. प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले नाहीत तरी ऑनलाइन शिक्षण सुरूच राहणार आहे. कोरोनाच्या महामारीच्या संकटात विद्यार्थी व शिक्षकांचे आरोग्य जपण्यासाठीच शिक्षण विभागाने हा निर्णय घेतल्याचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.
शिक्षण विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शाळांमध्ये आवश्यक सुविधांची, स्वच्छतेच्या साधनांची, वाहतुकीची व्यवस्था याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची असणार असल्याने हा निर्णय स्थानिक जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांच्यावर सोपविण्यात आला आहे. मुंबई महापालिका क्षेत्राप्रमाणेच राज्यातील इतर जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त यांच्याशी चर्चा सुरू असून स्थानिक परिस्थिती पाहूनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.