Join us

लोकल प्रवासी संख्येचा विस्फोट

By admin | Published: October 13, 2016 6:14 AM

मध्य रेल्वेवरील लोकल प्रवाशांच्या संख्येत एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. ठाणे स्थानकातील प्रवाशांची संख्या तब्बल

मुंबई : मध्य रेल्वेवरील लोकल प्रवाशांच्या संख्येत एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. ठाणे स्थानकातील प्रवाशांची संख्या तब्बल २२ लाखांनी वाढली आहे. वाढणाऱ्या प्रवासी संख्येमुळे लोकल सेवेवर ताण पडत असल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू सातत्याने सांगतात. प्रवासी संख्येबाबत रेल्वेने आकडेवारी जाहीर केली असून सहा महिन्यांत सर्वाधिक वाढ ठाणे स्थानकात असून तब्बल २२ लाख प्रवासी वाढले आहेत. त्यानंतर प्रवासी वाढलेल्या स्थानकांमध्ये दिवा, डोंबिवली, घाटकोपर,पनवेल, बदलापूर,मानखुर्दचा समावेश आहे. वाढत्या प्रवासी संख्येचा ताण कमी न झाल्यास प्रवास असह्य होण्याची भिती रेल्वे अधिकाऱ्याकडून व्यक्त केली जात आहे. मध्य रेल्वेवरील लोकलमधील प्रवासी संख्येत दोन टक्क्यांनी वाढ झाली. २०१६ च्या एप्रिल ते सप्टेंबर कालावधीत मध्य रेल्वेवरून ७४ कोटी १० लाख प्रवाशांनी प्रवास केल्याचे सांगण्यात आले. हीच संख्या गेल्या वर्षीच्या सहा महिन्यांत ७२ कोटी एवढी होती. यंदाच्या वर्षात प्रवासी संख्या वाढल्याने ४२४ कोटी रुपये इतका महसूल रेल्वेला मिळाला. गेल्या वर्षी महसुलाचे प्रमाण ४१४ कोटी १७ लाख होते. प्रवासी संख्या वाढल्याने लोकलवरील ताण प्रचंड वाढला असल्याचे रेल्वेचे अधिकारी म्हणाले. दिवा स्थानकातही सहा महिन्यांत १६ लाख आठ हजार प्रवासी संख्या वाढली आहे. दिवा स्थानकावर वाढत चाललेला भार पाहता या स्थानकात जलद लोकल गाड्यांना थांबा देण्यासाठी रेल्वेकडून कामही केले जात आहे. या दोन स्थानकांबरोबरच डोंबिवली १३ लाख, घाटकोपर स्थानक आणि मानखुर्द स्थानकात ११ लाख तर पनवेल आणि बदलापूर स्थानकात प्रत्येकी १० लाख प्रवासी संख्या वाढली असल्याचे सांगण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे सीएसटी, किंग्ज सर्कल, डॉकयार्ड, जीटीबी, करी रोड, रे रोड, कर्जत, विठ्ठलवाडी, शिवडी, बेलापूर, कॉटर्न ग्रीन स्थानकातील प्रवासी संख्येत फारशी वाढ झालेली नाही.