CSMT स्थानकात लोकल बफरला धडकली, डबा घसरला; हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 11:18 AM2022-07-26T11:18:23+5:302022-07-26T11:19:37+5:30
या अपघातात कोणलाही दुखापत झालेली नाही.
मुंबई: मंगळवार सकाळ चाकरमान्यांसाठी डोकेदुखी ठरणारी उजाडली. कारण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर हार्बर मार्गावरील एक लोकल बफरला धडकली आणि यामुळे रेल्वेचा एक डबाही स्थानकातच घसरला. यामुळे हार्बर मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात लोकलचा छोटासा अपघात झाला आहे. पनवेल लोकल फ्लॅटफॉर्मवरुन निघाल्यानंतर पुढे जाण्याऐवजी मागे गेल्याने हा अपघात झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे या पनवेल लोकलचा एक डबा रुळावरून घसरल्याचे सांगितले जात आहे. सीएसएमटी (CSMT) स्थानकात हार्बर मार्गासाठी केवळ दोनच प्लॅटफॉर्म आहेत. त्यातील एका प्लॅटफॉर्मवर अपघात झाल्याने एकच प्लॅटफॉर्म वाहतुकीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे हार्बर मार्गावर लोकल गाड्यांच्या खोळंबा होऊन वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. तर, अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
लोकल मागे आली आणि बफरला धडकली
रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९ वाजून ३९ मिनिटांनी CSMT वरुन पनवेलला जाणारी लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर होती. तिला ग्रीन सिग्नल दिल्यानंतर लोकल पुढे जाण्याऐवजी ती लोकल मागे आली आणि बफरला धडकली. यामध्ये कोणलाही दुखापत झालेली नाही. यामध्ये लोकलचा मागून चौथा कोच रुळावरुन घसरला आहे. सर्व प्रकारच्या यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांनी कोच पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत, असे ते म्हणाले.
Important for Harbor line commuters!@drmmumbaicrpic.twitter.com/z4B5sg1gML
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) July 26, 2022