लोकल गुंडाची मुजोरी सुरूच, रेल्वे पोलीस बल हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 06:14 AM2018-02-22T06:14:09+5:302018-02-22T06:14:15+5:30
उपनगरीय लोकलमधील गुंडांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे महिला प्रवाशांसह पुरुष प्रवाशांचा लोकल प्रवासही जीवघेणा ठरत आहे. बुधवारी सकाळी मीरा रोड स्थानकात गुंड प्रवृत्तीचा बळी वृत्तवाहिनीचे पत्रकार सुधीर शुक्ला हे ठरले आहेत
मुंबई : उपनगरीय लोकलमधील गुंडांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे महिला प्रवाशांसह पुरुष प्रवाशांचा लोकल प्रवासही जीवघेणा ठरत आहे. बुधवारी सकाळी मीरा रोड स्थानकात गुंड प्रवृत्तीचा बळी वृत्तवाहिनीचे पत्रकार सुधीर शुक्ला हे ठरले आहेत. लोकलच्या दरवाजातील ८-१० गुंडांनी शुक्ला यांना मारहाण केली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी स्थानकातील सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे तपास सुरू झाला आहे.
बुधवारी सकाळी शुक्ला हे मीरा रोड स्थानकात अंधेरी दिशेने जाणाºया लोकलची वाट पाहत होते. फलाटावर आलेल्या लोकलच्या दरवाजावर काही गुंड प्रवृत्तीचे प्रवासी उभे होते. या प्रवाशांनी दरवाजाची अर्धी बाजू रोखून धरली. उर्वरित बाजूने प्रवाशांना ये-जा करण्यास सांगितले. मीरा रोड स्थानकात लोकल आल्यावर शुक्ला यांना ‘मागच्या बोगीत जा,’ असे सांगितले. शुक्ला यांनी त्या बोगीत प्रवेश केला; मात्र लोकल सुरू झाल्यावर दरवाजातील प्रवासी आणि शुक्ला यांच्यात वाद झाला. याचे पर्यावसान मारामारीत झाले. या प्रकरणी स्थानकातील सीसीटीव्ही फूटेज तसापण्यात येईल. यासाठी ६ विशेष पथके तयार केली असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी दिली. मात्र यामुळे सुरक्षा यंत्रणा गुंड प्रवृत्तीसमोर हतबल असल्याचे दिसून येत आहे.