मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरात अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व आणि डी.एन. नगर ते दहिसर पूर्व या मार्गावर धावणाऱ्या मेट्रोसेवेला मान्सूनदरम्यान अडथळ्यांची शर्यत पार करावी लागू नये म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने कंबर कसली आहे. मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड होऊ नये, पावसाचे पाणी छताहून स्थानकांत उतरू नये या प्रमुख बाबींसह नियंत्रण कक्षातील प्रत्येक सेवा अद्ययावत आणि वेगवान राहावी यावर भर देण्याबाबत सूचना करण्यात आल्या असून, यासाठी अधिकाऱ्यांनी सज्ज राहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.गेल्या काही महिन्यांपूर्वीच मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ सुरू झाली असून, या मेट्रोला प्रवाशांची पसंतीही मिळत आहे. पश्चिम उपनगरात धावणाऱ्या मेट्रोच्या प्रवाशांची संख्या वाढत असून, यात दिवसागणिक भरच पडत आहे. पावसाळ्यात हीच मेट्रोसेवा बंद पडू नये किंवा तांत्रिक बिघाड होत नागरिकांना मनस्ताप होऊ नये म्हणून आयुक्तच थेट डेपोत उतरले. महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी यासाठी चारकोप मेट्रो डेपोतील संचलन नियंत्रण केंद्राला भेट दिली आहे आणि मान्सूनपूर्व देखभाल वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. श्रीनिवास यांनी चारकोप येथील मेट्रो डेपोला भेट दिली. यावेळी संचलन नियंत्रण केंद्रातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मान्सूनची सगळी कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
प्रवाशांशी संवाद- आयुक्तांनी मेट्रो प्रवाशांसोबतही संवाद साधला. लोकलपेक्षा मेट्रो प्रवास अधिक सुखकर असल्याचे प्रवाशांनी आयुक्तांना सांगितले. - उन्हाळ्यात गारेगार प्रवास अधिक सुखद असल्याचे प्रवाशांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी मेट्रो प्रवास आनंददायी आहे, यावर प्रवाशांनी भर दिला.
पूर्व तयारीची तपासणीमेट्रोसंदर्भातील कामे वेगाने होत असल्याची खात्री करतानाच पूर्वतयारीची तपासणी करण्यात आली.
महिला चालकांशी संवादमहिला मेट्रो चालकांशी संवाद साधताना आयुक्तांनी मान्सूनदरम्यानच्या दृश्यमानतेवरही भर दिला. पावसाळ्यात मार्ग दिसावा म्हणून ग्लास क्लिनिंगवरही भर देण्याची सूचना करण्यात आल्या.- विनाचालक ट्रेन आहेत.- सहा डबे असलेल्या ट्रेनची प्रवासी क्षमता २,३०८. - ट्रेनची डिझाइन केलेला ताशी वेग ९० कि.मी. - सरासरी वेग ताशी ३५ कि.मी. - स्थानकाची माहिती देण्यासाठी ऑटोमॅटिक पॅसेंजर अनाऊन्समेण्ट यंत्रणा - प्रत्येक दरवाजावर स्टेशनची माहिती देणारे डिजिटल रूटमॅप