मुंबई सेंट्रल कारशेडजवळ लोकलचे डबे घसरले दुपारच्या सुमारास गाड्यांना लेटमार्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 13:08 IST2024-10-14T13:08:11+5:302024-10-14T13:08:11+5:30
काही वेळानंतर या गाड्या जलद मार्गावर वळवल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई सेंट्रल कारशेडजवळ लोकलचे डबे घसरले दुपारच्या सुमारास गाड्यांना लेटमार्क
मुंबई : पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रलमधील कारशेडमध्ये प्रवेश करताना एका लोकलचे दोन डबे रुळांवरून घसरले. रविवारी दुपारी १२.१५ वा. ही घटना घडली. धीम्या मार्गावर ही घटना घडल्याने चार लोकल गाड्या अडकून पडल्या होत्या. त्यामुळे वाहतून काही काळ ठप्प झाली होती. काही वेळानंतर या गाड्या जलद मार्गावर वळवल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबई सेंट्रल - चर्चगेट स्थानकांदरम्यानच्या धीम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर वळवल्याने सर्वच गाड्यांना लेटमार्क लागला होता. सणासुदीला बाहेर पडलेल्या प्रवाशांचा दुपारच्या सुमारास खोळंबा झाला. संध्याकाळी ४ च्या सुमारास घसरलेले डबे बाजूला करण्यात आले. त्यानंतर सर्व सेवा पूर्ववत झाल्या. या घटनेचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी याबाबत तपासणी करण्यात येणार असल्याचे समजते. गेल्या काही वर्षांमध्ये याच ठिकाणी अशा चार घटना घडल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.