जागतिक पर्यावरण दिन; तज्ज्ञांनी अभ्यासातून सुचवले प्राथमिक उपाय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नैसर्गिक परिसंस्थांच्या पुनरुज्जीवनासाठी स्थानिक समाज केंद्रीत रचना निर्माण करावी लागेल, जी वातावरणातील बदलाला सक्षमपणे तोंड देऊ शकेल. या बदलाशी जुळवून घेण्याची मानसिकता आणि जागरूकता निर्माण करेल, असे प्राथमिक उपाय पर्यावरण तज्ज्ञांनी अभ्यासातून सुचविले आहेत. गाळयुक्त दलदलीची उत्पादकता टिकून आहे, याची खात्री करणे, जैवविविधतेचे संरक्षण, जड धातूंचे प्रदूषण नियंत्रित ठेवणे, ते कमी करण्यासाठी प्राधान्याने उपाययोजना करणे यासह स्थलांतरित पक्ष्यांचे अधिवास सुरक्षित करणे, अशा अनेक सूचनांचा यात समावेश आहे.
सृष्टी कन्झर्व्हेशन फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार नद्यांचे मुख गाळाने भरल्यामुळे त्याच्या संलग्न असलेल्या खाड्यांची तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील ज्यामध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उरण या भागांचा समावेश होतो; या भागातील पाणी वाहून आणणारे नदी / नाले यांची रुंदी कमी झालेली आहे. दिवसेंदिवस अरुंद होत असलेल्या खाड्या आणि नाले यासाठी खरंतर हे केवळ एकमेव कारण नाही तर याला बाकीचे अनेक घटक संयुक्तरित्या जबाबदार आहेत. किनाऱ्यावरील जमिनीच्या वापरात बदल झाल्याने पावसाळ्याशिवाय बाकीच्या महिन्यांमध्ये खाड्यांमध्ये जो सागरी लाटांचा त्रिकोणात्मक परिणाम (सरासरी भरतीमुळे खाडीत शिरणारे पाण्याचे प्रमाण आणि सरासरी ओहोटीनुसार खाडीतून समुद्राकडे जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण) होत असतो. यामध्ये घट झालेली दिसून येत आहे. याशिवाय वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे मुंबई महानगर क्षेत्रातील रहिवासी सोसायट्या सागरी पाण्याच्या पातळीच्या संकटाचा शिकार होण्याचा धोका वाढला आहे. पावसाळ्यात हा धोका फारच गंभीर आहे.
* पाण्याचा निचरा करण्याची क्षमता हाेणार कमी
संपूर्ण क्षेत्र काही काळानंतर कांदळवनांमध्ये, अत्यंत उथळ दलदलींमध्ये किंवा बऱ्याच भागातील कोरड्या जमिनींमध्ये रुपांतरित होतील. हे असे बदल झालेले क्षेत्र जे जलवाहतुकीसाठी पूर्णपणे अयोग्य होतील तसेच यामुळे वादळादरम्यान वाढणाऱ्या पाण्याचा निचरा करण्याची क्षमताही कमी होईल. परिणामत: हे सर्व क्षेत्र अधिवासासाठी आणि विशेषत: सारस पक्ष्यांच्या (फ्लेमिंगो) अधिवासासाठी ठाणेसहित अन्य भागात अयोग्य होईल.
- डॉ. दीपक आपटे, कार्यकारी संचालक, सृष्टी कॉन्झर्वेशन फाऊंडेशन
* खारफुटीच्या वाढीमुळे खाडी मार्गाची रुंदी कमी
कांदळवन विभागाने ठाणे खाडीतील खारफुटींची उपग्रहाद्वारे नकाशावर नोंद करून त्याचा अभ्यास केला आहे. या अभ्यासात खारफुटीत प्रचंड वाढ झाल्यामुळे खाडीतील पाण्याच्या वहन मार्गांची रुंदी कमी होत असल्याचे दिसून येते. आम्ही हा अहवाल काही किरकोळ बदलानंतर सुधारित करून लवकरच प्रकाशित करणार आहोत.
- वीरेंद्र तिवारी, कार्यकारी संचालक, मॅनग्रोव्ह फाऊंडेशन
* स्थानिकांसाठी ठरणार माेठी आपत्ती
कांदळवनाचे संरक्षण हे सतत येणारी वादळे आणि वाढत असलेल्या समुद्राच्या पातळीसाठी सक्षमपणे तोंड देण्यासाठी आवश्यक असले तरी सध्या अस्तित्वात असलेली शेती, खार जमिनी आणि पाण्याचे वहनमार्ग नष्ट होणे ही स्थानिकांसाठी प्रचंड मोठी आपत्ती ठरेल.
- भगवान केशभट, संचालक, वातावरण फाऊंडेशन
* समुद्र पातळीच्या वाढीमुळे हाेणार तीव्र परिणाम
सीआरझेड कायद्यात अनेक बदल करण्यात आले असून, किनारपट्टीवरील पर्यावरणाला संरक्षण देण्याच्या आपल्या उद्दिष्टाला ते हानिकारक ठरत आहे. पश्चिम किनारपट्टी व मुंबईसारख्या शहरांवर समुद्र पातळीच्या वाढीमुळे तीव्र परिणाम होईल, याची जाणीव असूनही प्रयत्न करण्यात येत नाहीत.
- स्टालिन डी., संचालक, वनशक्ती
* शतकाअखेरीस अर्धा मीटर भाग पाण्याखाली
मुंबईच्या किनाऱ्यालगत समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ ही दहा वर्षांत ३ सेंटीमीटर एवढ्या वेगाने होत आहे. ही वाढ आगामी दहा वर्षांच्या काळात ५ सेंटीमीटर एवढी होऊ शकते. म्हणजेच या शतकाअखेरीस अर्धा मीटर भाग हा पाण्याखाली असेल.
- रोक्सी म्याथ्यू कोल, वरिष्ठ शास्त्रज्ञ, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मॅनेजमेंट
........................