मुंबई - वेगाने वाहणारे वारे, कमी झालेली दृश्यमानता आणि मुसळधार पावसामुळे गुरुवारी पहाटेपासून मध्य रेल्वेच्या मेन लाईनसह हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूकीला ब्रेक लागला. विशेषत: या अडचणींमुळे रोजच्या तुलनेत लोकल धीम्या गतीने धावत असतानाच आलेल्या अडथळ्यांवर मात करताना प्रशासनाला ८४ हून अधिक लोकल फे-या रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी अशा पीक अवरला चाकरमान्यांना लेटमार्क लागला होता.
गुरुवारी पहाटे चार वाजल्यापासून मुंबई शहर आणि उपनगरात पावसाचा धडका सुरु होता. सकाळी अकरा वाजेपर्यंत सुरु असलेल्या पावसामुळे विक्रोळी आणि कुर्ल्यानजीक रुळावर साचलेल्या पाण्यामुळे लोकल वाहतूक धीम्या गतीने धावत होती. पावसाचा मारा दुपारी सुरु असेपर्यंत मध्य रेल्वे मार्गावरील लोकल २५ मिनिटांहून अधिक काळ विलंबाने धावत होत्या. दुपारी पाऊस थांबल्यानंतरही लोकलने विलंबाने धावत असल्याने मध्य रेल्वेच्या मेन लाईनसोबत हार्बर रेल्वे मार्गांवरील सर्वच स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. याच गर्दीतून पावसाचा मारा झेलत प्रवासी लोकलला लटकून प्रवास करत होते.
सकाळचा गोंधळ सुरु असतानाच सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास विक्रोळी आणि घाटकोपरदरम्यान अप लाईनवर रेल्वे रुळाला तडा गेल्याने प्रवाशांच्या मनस्तापात आणखी भर पडली. या काळात पुन्हा लोकलचा वेग कमी करण्यात आला होता. त्यामुळे लोकलला लागलेला लेटमार्क कायम होता. सकाळपासून सुरु असलेला हा गोंधळात तांत्रिक अडचणीची भर पडल्याने रात्री साडेसात वाजेपर्यंत मुंबईकर फलाटांवर ताटकळत असल्याचे चित्र होते. मोटरमनला लोकलचा वेग कमी करण्याच्या सूचना दिल्या गेल्या१) सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप आणि डाऊन लोकल २० ते ४० मिनिटे उशिराने धावत होत्या.२) हार्बर मार्गावरील सीएसएमटी- बेलापूर, पनवेल मार्गावरील अप आणि डाऊन लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या.३) पश्चिम रेल्वेवरील लोकल १० ते २० मिनिटे विलंबाने धावत होत्या. २६ जुलै रोजी रद्द झालेल्या गाड्या१) पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन एक्सप्रेस२) पुणे-सीएसएमटी प्रगती एक्सप्रेस३) सीएसएमटी-पुणे इंटर्नसिटी एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे कामे सुरू आहेत. त्याचा फटका तीन गाड्यांना बसणार आहे. ३० ऑगस्टपर्यंत या गाड्या ठाणे आणि दादरपर्यंतच धावतील. १२१३४ मंगळुरु ते सीएसएमटी एक्सप्रेस ठाण्यापर्यंत धावेल. मडगाव ते सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस आणि मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस दादरपर्यंत चालविली जाईल.