Join us

लोकलमध्ये व्यापाऱ्याला लुटणारे अटकेत

By admin | Published: March 17, 2016 2:20 AM

पंधरा दिवसांपूर्वी डॉकयार्ड रोड आणि रे रोड रेल्वे स्थानकांदरम्यान सहा आरोपींनी धावत्या लोकलमध्ये दरोडा घालत एका व्यापाऱ्याला लुटले होते. याबाबत वडाळा रेल्वे पोलिसांनी सोमवारी

मुंबई : पंधरा दिवसांपूर्वी डॉकयार्ड रोड आणि रे रोड रेल्वे स्थानकांदरम्यान सहा आरोपींनी धावत्या लोकलमध्ये दरोडा घालत एका व्यापाऱ्याला लुटले होते. याबाबत वडाळा रेल्वे पोलिसांनी सोमवारी यातील सहाही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. सहाही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अंधेरी येथे राहणारे रेहान बेग यांचा कॉस्मेटिक सामान विक्रीचा व्यवसाय आहे. त्यामुळे अंधेरीवरून नेहमीच ते माल घेण्यासाठी सीएसटी परिसरात जातात. २९ फेब्रुवारीला सायंकाळी सातच्या सुमारास ते हार्बर मार्गावरून सीएसटीच्या दिशेने जात होते. दरम्यान, रे रोड स्थानकात हे सहा आरोपी लोकलमध्ये चढले. लोकलला गर्दी कमी असल्याने आरोपींनी बेग यांना मारहाण करत, त्यांच्याकडील ३८ हजारांची रोख रक्कम काढून घेतली. या वेळी काही प्रवाशांनी विरोधदेखील केला. मात्र, त्यांनाही या आरोपींनी मारहाण केली. त्यानंतर लोकल डॉकयार्ड रेल्वे स्थानकात येताच, आरोपींनी लोकलमधून उडी घेऊन पळ काढला. याबाबत बेग यांनी तत्काळ वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनीदेखील तत्काळ गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला. पोलिसांनी स्थानकावरील सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतल्यानंतर आरोपींचा माग काढता आला. त्यानुसार, पोलिसांनी आयुुब खान (२६), जमाल मन्सुरी (२७), बिलाल शेख (२२), जुनेद खान (२१) मुर्तजा खान (२०) आणि फरहान खान (२०) या सहाही आरोपींना विविध भागांतून अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेली रक्कम हस्तगत केली आहे. या आरोपींवर अशा प्रकारे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)