मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेच्या हार्बर रेल्वे मार्गावर आज पुन्हा एकदा लोकल रुळावरुन घसरल्याची दुर्घटना घडली आहे. सीएसएमटी स्थानकाजवळच लोकलचा डबा रेल्वे रुळावरुन घसरला आहे. गेल्या दोन दिवसात दुसऱ्यांदा लोकलचा डबा रुळावरुन घसरण्याची घटना घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी स्थानकाजवळच चाचणी सुरू असताना रिकामी लोकल रुळावरुन घसरली आहे. या घटनेमुळे वडाळा-सीएसएमटी वाहतूक ठप्प झाली आहे. सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास पनवेलहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलचा डबा सीएसएमटी स्थानकाजवळ घसरला होता. यामुळे हार्बर रेल्वेची सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यानंतर आज पु्न्हा एकदा त्याच ठिकाणी चाचणी सुरू असताना लोकल रुळावरुन घसरली आहे.
सोमवारी ज्या ठिकाणी रेल्वे रुळावरुन घसरली होती. त्याठिकाणी दुरुस्ती करुन लोकलची चाचणी घेतली जात होती. पण दुरुस्तीनंतरही पुन्हा लोकल घसरली आहे. यामुळे प्रवाशांची मात्र कोंडी झाली आहे. आज १ मेची सुट्टी असल्यानं लोकल वाहतुकीवर नेहमीसारखा ताण नाही. असं असलं तरी हार्बर मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचणींना सामोरं जावं लागत आहे.