Join us

स्थानिक समीकरणेच निर्णायक

By admin | Published: January 16, 2017 2:06 AM

मुंबईचे खऱ्या अर्थाने प्रतिबिंब म्हणून दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचे उदाहरण देता येईल.

मुंबई : मुंबईचे खऱ्या अर्थाने प्रतिबिंब म्हणून दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचे उदाहरण देता येईल. संमिश्र प्रकारच्या या मतदारसंघात स्थानिक समीकरणे निर्णायक ठरणार आहेत. कारण ज्याची स्थानिक राजकारणावर पकड असेल तोच उमेदवार मुंबई महापालिकेत आपल्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.मुंबईतील दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाची खासदारकी शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांच्याकडे आहे. काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांना पराभवाचा धक्का देत शेवाळे यांनी हा मतदारसंघ शिवसेनेकडे खेचून आणला. लोकसभा निवडणुकीपूर्वी नगरसेवक आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद म्हणून राहुल शेवाळे यांचा मुंबईला परिचय होताच. एकेकाळी महापालिकेच्या सत्ताकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शेवाळे यांच्याकडे आता या मतदारसंघातून शिवसेनेचे जास्तीतजास्त नगरसेवक निवडून आणण्याची मोठी जबाबदारी असणार आहे. अणुशक्तीनगर, चेंबूर, धारावी, सायन-कोळीवाडा, वडाळा आणि माहीम या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात होतो. चेंबूर, सायन-कोळीवाडा, धारावी या मतदारसंघात नागरिकांना मोठ्या प्रमाणात नागरी समस्यांना तोंड द्यावे लागते. यातील काही भागांत तर आजही पिण्याचे पाणी ही मोठी समस्या आहे. शिवाय, सर्वांत मोठी झोपडपट्टी म्हणून मिरवणाऱ्या धारावीत या नागरी समस्यांच्या जोडीला वर्षानुवर्षे रखडलेला पुनर्विकासाचा प्रश्न आहेच. प्रत्येक निवडणुकीत हा मुद्दा चर्चेत येतो. निवडणूक आली की सत्ताधारी एखाद्या छोट्यामोठ्या निर्णयाच्या माध्यमातून पुनर्विकासाचे पिल्लू सोडतात. त्यावर लागलीच विरोधी पक्ष अमक्याच चौरस फुटांचे घर हवे, अशी हाकाटी देत मोर्चे-निदर्शने करू लागतात. त्यामुळे एकूणच धारावी पुनर्विकास म्हणजे राजकारण्यांसाठी गाजराची पुंगी बनली आहे. दुसरीकडे माहीम मतदारसंघाने गेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला चांगलेच आस्मान दाखविले होते. दादर, प्रभादेवी आणि माहीम या परिसरातील सर्व नगरसेवक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहेत. एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या या परिसरातून शिवसेनेचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. शिवसेना भवन, शिवाजी पार्क असणाऱ्या भागात शिवसेनेचा एकही नगरसेवक नसावा, ही वस्तुस्थिती स्वीकारणे शिवसेनेला बरेच जड गेले. यंदा मात्र बालेकिल्ला मिळविण्यासाठी शिवसेनेने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ म्हणजे झोपडपट्टीपासून टोलेजंग इमारती, आखीवरेखीव सोसायट्यांपासून नागरी सुविधांचा स्पर्शही न झालेल्या वस्त्या आणि कधीकाळी आपली श्रीमंती मिरवणाऱ्या पण आज पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या इमारती, अशा विविधरंगी परिसराला तितक्याच बहुविध प्रश्नांनी वेढले आहे. यातील काहीप्रश्नांचा कदाचित महापालिका प्रशासनाशी थेट काहीच संबंध नाही. परंतु, महापालिकेच्या रणधुमाळीत त्या आघाडीवर काय केले, याचा लेखाजोखा मात्र मत मागायला येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला द्यावाच लागेल. (प्रतिनिधी)>पुनर्विकास ठरणार कळीचा मुद्दाचाळी आणि झोपडपट्टी पुनर्विकासाबाबत राज्य सरकारने अलीकडेच केलेल्या घोषणा शिवसेना आणि भाजपाला त्याचा काही प्रमाणात लाभ मिळवून देतील. पुनर्विकासाचे काम प्रत्यक्ष सुरू होईपर्यंत मात्र स्थानिक आमदार आणि नगरसेवकांना आपल्या निधीतूनच येथील दुरुस्ती, डागडुजीचे काम करावे लागते. पुनर्विकासाच्या मुद्द्यावर बिल्डरांच्या सोयीची भूमिका घेणाऱ्या नेत्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी रहिवाशांनी आपल्या मागण्यांबाबत आक्रमक भूमिका घेतल्याने प्रकल्प रखडल्याचेही उदाहरणे आहेत.पारसी कॉलनी, हिंदू कॉलनी, शिवाजी पार्क या सधन पट्ट्यातील इमारती हेरिटेजच्या कचाट्यात सापडल्या होत्या. त्यातून कशीबशी सुटका झाली असली तरी बांधकाम व्यवसायातील मंदीमुळे बहुतांश इमारतींच्या पुनर्विकासाचे प्रकल्प रखडले आहेत. काही ठिकाणी तर आठ वर्षांपासून प्रकल्प ठप्प असल्याने रहिवाशांच्या माथी लांबलेले विस्थापन आले आहे. तर अनेक जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासासाठी योग्य विकासक मिळेनासे झाल्याचे चित्र आहे. आरसीएफ, टाटा थर्मल, चप्पल व्यावसायिक आणि डम्पिग ग्राउंडमुळे स्थानिक हैैराण झाले आहेत. चेंबूर, अणुशक्तीनगर आणि धारावीतील प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत असल्याने स्थानिकांना श्वसनाचे आणि घशाच्या विकारांना सामारे जावे लागत आहे. प्रदूषणाविरोधात स्थानिकांनी अनेक तक्रारी दाखल करूनही यंत्रणा ढिम्मच आहेत. >पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष या मतदारसंघातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना रोजच संघर्ष करावा लागतो. पालिकेने पाण्याबाबत कितीही गप्पा मारल्या तरी एक - दोन तासांपेक्षा अधिक काळ येथे पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे पाणीमाफियांचाही मोठा सुळसुळाट या भागात आहे. अणुशक्तीनगर, चेंबूर आणि काही प्रमाणात सायन कोळीवाड्यात पाण्याचा प्रश्न मोठा आहे. >आधीच अरुंद असणाऱ्या येथील अनेक रस्त्यांवर मोनो मार्गिका आणि मोनो स्थानकांचे काम सुरू आहे. गेली पाच-सहा वर्षे चेंबूरमधील नागरिक मोनोच्या धिम्या प्रकल्पामुळे वैतागले होते. मोनो मार्गिकेच्या मधल्या जागेत होणाऱ्या अवैध पार्किंगमुळे एका वेळी एकच वाहन जाईल इतकीच जागा शिल्लक राहते. त्यामुळे घाईच्या वेळात क्षुल्लक कारणांनी होणारी वाहतूककोंडी नित्याची बाब आहे. आता तर मेट्रो प्रकल्पासाठी ठिकठिकाणी खोदकाम सुरू असल्याने अख्ख्या मतदारसंघाचीच कोंडी झाली आहे. >अणुशक्ती नगर : शिवसेनेचे तुकाराम काते यांनी राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांचा पराभव करत आमदारकी पटकावली. ऐंशी टक्के झोपडपट्टी असणाऱ्या या परिसरात नागरी सुविधांची वानवा आहे. पिण्याचे पाणी, नाले, गटारांची मोठी समस्या या मतदारसंघात आहे. स्थानिक जनसंपर्काच्या आधारावर येथील महापालिकेची समीकरणे ठरत आली आहेत. शिवसेनेसाठी पक्षसंघटनेचे जाळे जमेची बाजू ठरणार आहे. चेंबूर : शिवसेनेचे प्रकाश फातर्पेकर या भागातील आमदार. मिश्र लोकवस्तीचा हा भाग. मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूककोंडी तसेच हवेच्या प्रदूषणामुळे येथील नागरिक त्रस्त आहेत. काही भागांत झोपडपट्टी पुनर्विकासाचे रखडलेले प्रकल्प या निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. धारावी : काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांच्याकडे या मतदारसंघाची आमदारकी. आघाडीच्या काळात त्यांनी मंत्रिपदही भूषविले. मोदी लाटेत वडील एकनाथ गायकवाडांना खासदारकी गमवावी लागली. पण वर्षा गायकवाडांनी मात्र धारावी राखण्यात यश मिळविले. धारावीला नोटाबंदीचा मोठा फटका बसल्याने महापालिका निवडणुकीत त्याचा फायदा होईल, असा दावा काँग्रेसकडून करण्यात येत आहे. सायन-कोळीवाडा : कॅप्टन तमिळ सेल्वन यांच्या रूपाने भाजपाने हा मतदारसंघ स्वत:कडे खेचला. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील लाटेचा फायदा इथे भाजपाला मिळाला. दक्षिण भारतीय, पंजाबी, उत्तर भारतीय, कोळीवाडे अशी मिश्र लोकवस्ती या मतदारसंघात आहे. वडाळा : काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर या विभागाचे सातवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. निवडणुकीपूर्वी भाजपाला उमेदवारही बाहेरून आयात करावा लागला. पण निकालावेळी मात्र याच आयात उमेदवाराने कोळंबकरांना झुंजवले. माहीम : शिवसेनेचे सदा सरवणकर येथील आमदार. शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या या परिसरातील सर्व नगरसेवक मात्र मनसेचे. सदा सरवणकरांसमोर मनसेचे हेच वर्चस्व मोडून काढण्याची मोठी जबाबदारी आहे. लोकप्रियता आक्रसली असली तरी मनसेने आपली सारी शक्ती याच भागात केंद्रित केली आहे.