मुंबई : लोकलमध्ये ‘फटका गँग’ची शिकार ठरलेली २३ वर्षांची द्रविता सिंग आता मुंबई मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी सज्ज झाली आहे. जवळपास १० महिन्यांनंतर द्रविता आता आत्मविश्वासाने पाऊल टाकू शकते आहे. द्रविताच्या डॉक्टरांनी आपल्यासह तिलाही मॅरेथॉनमध्ये सहभागी करून इतरांसाठी आदर्श घालून देण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्याप्रमाणे, येत्या २० जानेवारीला मुंबईत पार पडणाऱ्या स्पर्धेत डॉक्टरांसह द्रविता सहभागी होणार आहे.छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाºया लोकलमधून ७ फेब्रुवारी, २०१७ रोजी कल्याणला राहणाºया द्रविताला अपघात झाला. घटनेवेळेस द्रविताचा फोन खेचल्यामुळे लोकलच्या डब्यातून हात सटकला आणि ती रुळांवर पडली. मदतीला कुणीही नसल्याने तिच्या एक हात आणि पायावरून दुसरी लोकल गेली होती. त्यानंतर, तिच्यावर सहा जटिल शस्त्रक्रिया करण्यात आल्या, या प्रवासात तिने खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीने उभे रहायचे ठरविले होते. या अपघातात तिच्या उजव्या पायाचा अंगठा आणि डाव्या हाताची बोटे तिने गमावली आहेत, परंतु याही परिस्थितीवर मात करून आता द्रविता धावण्यासाठी सज्ज झाली आहे. आता द्रविताला चालण्या-धावण्यासाठी विशेष चपला-बूट वापरावे लागतात. मात्र, पुन्हा एकदा तिने लोकल प्रवास सुरू केला आहे.खडतर प्रवासाविषयी द्रविता सांगते की, या काळात आयुष्यभर मनात कोरल्या जातील इतक्या वेदना माझ्या शरीरावर तर झाल्या, मात्र मनावरही झाल्यात, पण त्याच कटू आठवणींना मागे सारून माझ्यासारख्या व्यक्तींना आदर्श घालून देण्यासाठी डॉ. शैलेश रानडे यांनी मॅरेथॉनमध्ये धावण्याचे स्वप्न दाखविले होते. ते पूर्ण करण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून ठरावीक तास तास धावणे, व्यायाम आणि योगा करणे हा नित्यक्रम पाळते आहे. शारीरिक तयारीप्रमाणेच मानसिक तयारीसाठी या काळात समुपदेशनाने खूप मदत केली, परंतु केवळ जिद्द आणि कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे पुन्हा एकदा जगण्याचे बळ मिळाले आहे.
लोकल अपघातातील द्रविता धावणार मुंबई मॅरेथॉनमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2019 6:10 AM