एक्स्प्रेसमधूनही ‘लोकल’ प्रवास?
By admin | Published: December 15, 2015 02:15 AM2015-12-15T02:15:03+5:302015-12-15T02:15:03+5:30
डोंबिवलीकर भावेश नकाते या तरुणाचा सीएसटीकडे येणाऱ्या लोकलमधून पडून मृत्यू झाल्यानंतर, प्रवाशांचा गर्दीतील प्रवास सुकर करण्यासाठी मध्य रेल्वेकडून विविध पर्याय शोधले
मुंबई : डोंबिवलीकर भावेश नकाते या तरुणाचा सीएसटीकडे येणाऱ्या लोकलमधून पडून मृत्यू झाल्यानंतर, प्रवाशांचा गर्दीतील प्रवास सुकर करण्यासाठी मध्य रेल्वेकडून विविध पर्याय शोधले जात आहेत. त्यासाठी सकाळच्या सुमारास सीएसटीकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या ट्रेनमधूनही प्रवासास मुभा देण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेकडून तयार करण्यात आला आहे. प्रथम तीन एक्सप्रेस गाड्यांचा यात समावेश करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली.
सकाळच्या वेळेत कल्याणपासून सीएसटीला येण्यासाठी प्रवाशांना प्रचंड गर्दीला सामोरे जावे लागते. यात कल्याण ते ठाणे पट्ट्यातील प्रवाशांना तर गर्दीमुळे लोकलमध्ये चढणेही अशक्य होते. त्यामुळे अनेक प्रवासी दोन ते तीन लोकल सोडल्यानंतर एखादी कमी गर्दी असणारी लोकल पकडतात. या प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी मध्य रेल्वेने हा प्रस्ताव तयार केला आहे.
या प्रस्तावानुसार लांब पल्ल्याच्या ट्रेनमधून लोकल प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा देण्यात येणार आहे. फक्त कल्याण ते सीएसटी अशा एक दिशेला येणाऱ्या प्रवासास मुभा असेल. त्यासाठी प्रथम महालक्ष्मी एक्स्प्रेस, सीएसटीला येणारी लातूर एक्स्प्रेस व सिकंदराबाद ते सीएसटी देवगिरी एक्स्प्रेसची निवड मध्य रेल्वेकडून केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
रेल्वे बोर्डाच्या मंजुरीची आवश्यकता
लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून प्रवासास मुभा देण्यात येणार असल्याने आणि स्वतंत्रपणे तिकीट आकारणी केली जाणार असल्याने, त्यासाठी रेल्वे बोर्डाच्या मंजुरीचीही आवश्यकता आहे आणि हा प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
सध्या होतो अनधिकृत प्रवास : सध्या कल्याण, तसेच ठाण्यात राहणारे आणि शहरी भागात नोकरी, तसेच कामकाजासाठी येणारे अनेक जण कल्याण ते सीएसटी दरम्यानचा प्रवास मेल-एक्स्प्रेसमधूनही करतात. मात्र, हा प्रवास अनधिकृत असून, रेल्वेकडून कोणतीही परवानगी नाही. त्या विरोधात आरपीएफकडून कारवाईदेखील केली जाते.
प्रतिसादाबद्दल प्रश्नचिन्ह
मरेकडून ३ एक्स्प्रेस गाड्यांमधून जरी लोकल प्रवाशांना प्रवासास मुभा दिली, तरी या लोकल स. ७ ते ८च्या सुमारास सीएसटीपर्यंत दाखल होतात. त्यामुळे या प्रयोगाला किती प्रतिसाद मिळेल, हा प्रश्नच आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे पासधारकांनाच या ट्रेनमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात येणार असून, त्यासाठी स्वतंत्रपणे कुपन पद्धतीने पैसे आकारण्यात येतील. ही सेवा सुरू करताना ती प्रायोगिक तत्त्वावर करावी की कायमस्वरूपी याचा विचार रेल्वेकडून केला जाणार आहे.
- महालक्ष्मी एक्सप्रेस सकाळी कल्याणला सव्वा सहाच्या सुमारास येते. ती ७.२५च्या सुमारास सीएसटीला पोहोचते.
- लातूर ते सीएसटी
एक्सप्रेस जी सकाळी पावणे सात कल्याणला येते. ती सकाळी आठ वाजेपर्यंत सीएसटीला पोहोचते.
- सिकंदराबाद ते सीएसटी देवगिरी एक्सप्रेस सकाळी
पावणे सहाच्या सुमारास पोहोचते. ती सीएसटीला स. ७.१0 वाजता पोहोचते.