एक्सप्रेसमधूनही 'लोकल' प्रवास ?
By admin | Published: December 15, 2015 09:38 AM2015-12-15T09:38:08+5:302015-12-15T09:44:50+5:30
डोंबिवलीकर भावेश नकाते या तरुणाचा सीएसटी लोकलमधून पडून मृत्यू झाल्यानंतर, प्रवाशांचा गर्दीतील प्रवास सुकर करण्यासाठी मध्य रेल्वेकडून विविध पर्याय शोधले जात आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ : डोंबिवलीकर भावेश नकाते या तरुणाचा सीएसटी लोकलमधून पडून मृत्यू झाल्यानंतर, प्रवाशांचा गर्दीतील प्रवास सुकर करण्यासाठी मध्य रेल्वेकडून विविध पर्याय शोधले जात आहेत. त्यासाठी सकाळच्या सुमारास सीएसटीकडे येणार्या लांब पल्ल्याच्या ट्रेनमधूनही प्रवासास मुभा देण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेकडून तयार करण्यात आला आहे. प्रथम तीन एक्सप्रेस गाड्यांचा यात समावेश करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकार्याकडून देण्यात आली.
सकाळच्या वेळेत कल्याणपासून सीएसटीला येण्यासाठी प्रवाशांना प्रचंड गर्दीला सामोरे जावे लागते. यात कल्याण ते ठाणे पट्टय़ातील प्रवाशांना तर गर्दीमुळे लोकलमध्ये चढणेही अशक्य होते. त्यामुळे अनेक प्रवासी दोन ते तीन लोकल सोडल्यानंतर एखादी कमी गर्दी असणारी लोकल पकडतात. या प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी मध्य रेल्वेने हा प्रस्ताव तयार केला आहे.
या प्रस्तावानुसार लांब पल्ल्याच्या ट्रेनमधून लोकल प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा देण्यात येणार आहे. फक्त कल्याण ते सीएसटी अशा एक दिशेला येणार्या प्रवासास मुभा असेल. त्यासाठी प्रथम महालक्ष्मी एक्स्प्रेस, सीएसटीला येणारी लातूर एक्स्प्रेस व सिकंदराबाद ते सीएसटी देवगिरी एक्स्प्रेसची निवड मध्य रेल्वेकडून केल्याचे अधिकार्याने सांगितले.
रेल्वे बोर्डाच्या मंजुरीची आवश्यकता
लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून प्रवासास मुभा देण्यात येणार असल्याने आणि स्वतंत्रपणे तिकीट आकारणी केली जाणार असल्याने, त्यासाठी रेल्वे बोर्डाच्या मंजुरीचीही आवश्यकता आहे आणि हा प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
सध्या होतोअनधिकृत प्रवास : सध्या कल्याण, तसेच ठाण्यात राहणारे आणि शहरी भागात नोकरी, तसेच कामकाजासाठी येणारे अनेक जण कल्याण ते सीएसटी दरम्यानचा प्रवास मेल-एक्स्प्रेसमधूनही करतात. मात्र, हा प्रवास अनधिकृत असून, रेल्वेकडून कोणतीही परवानगी नाही. त्या विरोधात आरपीएफकडून कारवाईदेखील केली जाते.