‘स्थानिक मुस्लिमांना राजकारणात संधी हवी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 02:14 AM2019-04-07T02:14:25+5:302019-04-07T02:14:28+5:30

परप्रांतीयांचे नेतृत्व नको : नेतादेखील भूमिपुत्र हवा

'Local Muslims want opportunities in politics' | ‘स्थानिक मुस्लिमांना राजकारणात संधी हवी’

‘स्थानिक मुस्लिमांना राजकारणात संधी हवी’

Next

- खलील गिरकर 


मुंबई : राज्यातील सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीमध्ये राज्यातील मराठी भाषिक मुस्लीम समाजाला राजकारणात पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी पुढे आली आहे. विविध राजकीय पक्षांत असलेल्या मुस्लीम समाजातील नेत्यांमध्ये महाराष्ट्राबाहेरील नेत्यांचा वरचष्मा आहे. त्यामुळे राज्यातील मराठी भाषिक मुस्लीम नेत्यांना राजकारणात संधी देण्याची मागणी पुढे आली आहे.


काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसोबत याबाबत चर्चा झाली होती; मात्र समाधानकारक तोडगा काढण्यात अपयश आल्याने नाराजीचे वातावरण आहे. महाराष्ट्रीय मुस्लीम विकास परिषदेच्या माध्यमातून याबाबत लढा देण्यात येत आहे.


राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत बैठक झाली होती मात्र काहीही मार्ग निघाला नव्हता, त्यामुळे परिषदेने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्यास वंचित आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष फारुख अहमद ऊर्फ मराठा खान यांनी दिली. राष्ट्रवादी सोबत चर्चा करताना त्यांनी प्रश्न सोडवण्याऐवजी थेट पाठिंबा असल्याचे घोषित करण्यात येत असल्याने त्याला परिषदेने विरोध केला. अ‍ॅड एफ एम ठाकूर यांनी देखील याबाबत काही वर्षांपूर्वी असाच प्रयत्न केला होता मात्र अद्याप त्याला यश आलेले दिसत नाही.


महाराष्ट्रातील मराठी भाषिक मुस्लिम समाजाची नाळ राज्याशी जुळलेली आहे. त्यामुळे अनेकदा मराठी संस्कृतीचा प्रचार प्रसार त्यांच्याद्वारे होत असतो. मात्र, परप्रांतीय मुस्लिम समाजाच्या नेत्यांना अकारण महत्त्व देऊन राज्यातील मुस्लिम नेत्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न मुस्लिम समाज यापुढे चालवून घेणार नाही, असा इशारा परिषदेचे नेते मराठा खान यांच्यासहित अजिज पठाण, मुश्ताक शेख, अजीम तांबोळी व इतरांनी दिला आहे. राज्यातील मुस्लिम समाजाचे राजकीय नेतृत्व हे प्रामुख्याने मराठी भाषिक मुस्लिम किंबहुना राज्याचा भूमीपुत्र मुस्लिमच असावा असा सूर व्यक्त करण्यात येत आहे.

‘चित्र बदलण्याचे प्रयत्न’
बृहन्मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात राज्याबाहेरील नागरिकांचे वास्तव्य असल्याने व त्यांची संख्या तुलनेने जास्त असल्याने विविध राजकीय पक्षांमध्ये प्रस्थापित मुस्लीम नेते हे परप्रांतीय असल्याचे चित्र आहे. हे चित्र बदलण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचा दावा खान यांनी केला आहे.

Web Title: 'Local Muslims want opportunities in politics'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.