Join us

खार उन्नत मार्गाला स्थानिकांचा विरोध

By जयंत होवाळ | Published: May 01, 2024 8:37 PM

पालिका प्रशासन नेमकी काय भूमिका घेते यावर प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे.

मुंबई : खार सबवेत होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी मुंबई महापालिकेने प्रशासनाने उन्नत मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला खरा; परंतु स्थानिकांच्या तीव्र विरोधामुळे या प्रकल्पापुढे प्रश्नचिन्ह लागले आहे. त्यामुळे आता पालिका प्रशासन नेमकी काय भूमिका घेते यावर प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे.

खार पूर्व आणि खार पश्चिम परिसर जोडण्यासाठी उन्नत मार्ग बांधला जात आहे. हा मार्ग पुढे पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडला जाणार आहे. या मार्गामुळे खार सबवेसह सांताक्रूझ पूर्व पट्ट्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असा पालिकेचा दावा आहे. या प्रकल्पासाठी निविदाही काढण्यात आली आहे. मात्र खार- सांताक्रूझमधील १४० हून अधिक इमारतींतील रहिवाशांनी उन्नत मार्गाला विरोध दर्शविला आहे. पुलाचा आराखडा चुकीचा आहे. उन्नत मार्गामुळे पूर्व आणि पश्चिम परिसरात राहणाऱ्यांना फायदा होणार नाही, असा आक्षेप ‘सांताक्रूझ ईस्ट रेसिडेंट असोसिएशन’चा आहे.

मार्ग ज्या भागात बांधला जाणार आहे ती जमीन हवाई दलाची आहे. त्यामुळे आराखड्यात बदल करावा लागला, असे पालिकेचे म्हणणे आहे. उन्नत मार्गाचा आराखडा बरोबर नाही. या मार्गामुळे परिसरातील १४० इमारतींमधील रहिवाशांना त्रास होणार आहे.पालिकेने आधी परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे असोसिएशनचे म्हणणे आहे. उन्नत मार्गाची निविदा रद्द करावी, अशी मागणी संघटनेने पालिका आयुक्तांकडे केली आहे. त्यावर लोकांच्या हरकती लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल, त्यांनी सुचवलेल्या पर्यायी मार्गाची चाचपणी करण्यात येईल, असे पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :मुंबई