मुंबई : महामुंबईतील लसधारकांना १५ ऑगस्टपासून प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. १४ सप्टेंबरपर्यंत महापालिकेने दिलेल्या ओळखपत्रांच्या आधारे मध्य, पश्चिम, हार्बर, ट्रान्स हार्बरवरील तब्बल ८ लाख ३२ हजार ७७४ लसधारकांनी मासिक पास घेतला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत पास विक्रीत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे.
१८ ते ४४ वयोगटांतील प्रवाशांचा पहिला डोस जूनमध्ये झाला. त्यांना दुसऱ्या डोससाठी ८४ दिवसांचे अंतर, त्यानंतर १४ दिवस असे ९८ दिवसांचे अंतर आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, सप्टेंबरमध्ये पूर्ण झाले आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये प्रवासी संख्येत वाढ होत आहे.
लसधारकांनी रेल्वे स्थानकांवरील स्थानिक महापालिकेच्या पडताळणी केंद्रावर ऑफलाइन पद्धतीने पडताळणी ११ ऑगस्टपासून सुरू करण्यात आली. १४ सप्टेंबरपर्यंत या पद्धतीने मध्य रेल्वे मार्गावर ६,१३,७८८ लसधारकांनी पास काढले. पश्चिम रेल्वेवरील लसधारक पास घेण्याऱ्यांची संख्या २,१८,९८६ इतकी आहे. मध्य रेल्वेवरील डोंबिवली स्थानकात आणि पश्चिम रेल्वेवरील बोरीवली स्थानकात सर्वाधिक पासची विक्री झाल्याचे मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. मध्य रेल्वे मार्गावर रविवारपर्यंत १५ ते २० हजारांपर्यंत पास विक्री होत होती. आता सोमवारी हा आकडा २९ हजार झाला आहे. पश्चिम रेल्वेत चार ते साडेचार हजार पास विक्री होत होती. मंगळवारी हा आकडा ८ हजार आणि १० हजार झाला आहे.