लोकलची वाट बिकट
By Admin | Published: March 31, 2016 02:16 AM2016-03-31T02:16:32+5:302016-03-31T02:16:32+5:30
मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर भविष्यात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. मात्र, या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे, परंतु सध्या उपनगरीय रेल्वेची
मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर भविष्यात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. मात्र, या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे, परंतु सध्या उपनगरीय रेल्वेची आर्थिक स्थिती बिकट असून, उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत असल्याची कबुली एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) देण्यात आली. प्रकल्पांसाठी निधी उभा करण्याची गरज असून, त्यासाठी अनेक पर्याय शोधले जात असल्याची माहिती एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आगामी प्रकल्पांसाठी निधी उभा करायचा कसा? असा प्रश्न असल्याचे सहाय म्हणाले. मुंबई उपनगरीय रेल्वेतून उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत आहे आणि तोट्यालाही सामोरे जावे लागत आहे. २00८-0९ रोजी १ हजार १७९ कोटी उत्पन्न मिळाले होते आणि खर्च हा १,५0७ कोटी, तर तोटा ३२९ कोटी रुपये झाला होता, परंतु २0१४-१५ ची परिस्थिती पाहिल्यास १ हजार ६४१ उत्पन्न मिळाले असून, ३ हजार ६७ कोटी रुपये खर्च आला आहे आणि तोटा तब्बल १ हजार ४२६ कोटींवर पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.
भाडेवाढीची गरज
उत्पन्नाबरोबरच प्रकल्पांसाठी निधी उभा करण्याची गरज असल्याने, लोकलच्या तिकीट दरवाढीलाही त्यांनी पाठिंबा दिला.
तिकीट दरवाढ झाल्यास उत्पन्न मिळेल आणि प्रकल्पही मार्गी लागतील, अशी आशा एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांनी व्यक्त केली.
निधीची कमतरता आणि इतर अडचणींमुळे लोकलचे अनेक प्रकल्प रखडतात. भविष्यात सुरू केल्या जाणाऱ्या प्रकल्पांसाठी जवळपास ३५ ते ४0 हजार कोटी रुपये खर्च येणार असून, हा निधी उभा करायचा कसा? असा प्रश्न असल्याचे प्रभात सहाय
यांनी स्पष्ट केले.
उपनगरीय मार्गावरील आगामी प्रकल्प
प्रकल्पखर्च
विरार-वसई-पनवेल नवीन मार्ग७,५८६
कल्याण-कसारा तिसरा व चौथा मार्ग३,५३६
कल्याण ते कर्जत तिसरा व चौथा मार्ग२,३७२
सीएसटी-कल्याण धिम्या मार्गावर सीबीटीसी५,६७७
चर्चगेट-विरार धिम्या मार्गावर सीबीटीसी४,२२३
पनवेल-पेण-जिते-अलिबाग नवीन कॉरिडोर३,५९0
प्रकल्पखर्च
कुर्ला-ठाणे-भिवंडी प्रीमियम एलिव्हेटेड कॉरिडोर७,४८0
हार्बरवर कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल सीस्टम४,0८२
पनवेल ते कर्जत नवीन कॉरिडोर २, ६१८
ऐरोली ते कळवा लिंक रोड ४२८
विरार ते डहाणू चौपदरीकरणासाठीही ३,५५५
(खर्च कोटीमध्ये)